देखण्या पदपथांना अतिक्रमणांचे ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पुणे - शहरातील शोभिवंत आणि देखणा रस्ता म्हणून तयार करण्यात आलेल्या जंगली महाराज रस्त्याला अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे. पदपथ रुंद झाले तरी त्याचा वापर पादचाऱ्यांपेक्षा अनधिकृत पथारीवालेच जास्त करू लागले आहेत. हाकेच्या अंतरावर महापालिका असूनही संबंधित अधिकारी त्याकडे काणाडोळा करीत आहेत.

पुणे - शहरातील शोभिवंत आणि देखणा रस्ता म्हणून तयार करण्यात आलेल्या जंगली महाराज रस्त्याला अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे. पदपथ रुंद झाले तरी त्याचा वापर पादचाऱ्यांपेक्षा अनधिकृत पथारीवालेच जास्त करू लागले आहेत. हाकेच्या अंतरावर महापालिका असूनही संबंधित अधिकारी त्याकडे काणाडोळा करीत आहेत.

शहरी पथ धोरणांतर्गत (अर्बन स्ट्रीट गाइड लाइन्स) जंगली महाराज रस्ता ‘मॉडेल रोड’ म्हणून विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च झाले असून, येत्या नऊ महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या रस्त्यावर पूर्वी दोन मीटर रुंदीचे पदपथ होते. आता त्यांची रुंदी सुमारे चार ते पाच मीटर करण्यात येत आहे. त्यामुळे पादचारी सुखावले आहेत.

मात्र या पदपथावर बहुतांश ठिकाणी पथारीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यातच दुकानदारांनी काही ठिकाणी त्यांचे जाहिरात फलक पदपथावरच उभे केले असून. त्याचा पादचाऱ्यांना अडथळा होत आहे. या पदपथाला जोडूनच सुमारे दोन मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक तयार केला आहे. परंतु त्याचा वापर सध्या वाहने उभी करण्यासाठीच होत आहे. जंगली महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्यांचे अतिक्रमण वाढले आहे. तेथे येणाऱ्या ग्राहकांच्या दुचाकी रस्त्यावरच उभ्या राहतात. त्यामुळे पदपथावरून चालणे नागरिकांना अक्षरशः अवघड झाल्याचे दिसून येते.

कारवाईसाठी एक महिना
या रस्त्यावरील अतिक्रमणांवर महापालिका कारवाई कधी करणार, या बाबत विचारणा केली असता, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख माधव जगताप म्हणाले, ‘‘अतिक्रमण विभागाकडून अधिकृत पथारीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानंतर अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई होईल. त्यासाठी एक महिना लागेल.’’

बैठक व्यवस्था, सायकल ट्रॅक
‘पुणे स्ट्रीट प्रोग्रॅम’ योजनेअंतर्गत रस्त्याची वाहनक्षमता रुंदी (कॅरेज विड्‌थ) एकसारखी ठेवण्यात आली आहे. तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि सायकल ट्रॅक, ठिकठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. बस स्थानकांचे सुशोभीकरणही सुरू आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना समांतर पार्किंगही उपलब्ध करून दिले आहे.

१०० किलोमीटर रस्ते सुशोभित
शहरी पथ धोरणांतर्गत महापालिकेने शहरातील १०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची पुनर्रचना करून रस्ता सुशोभित करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १८ महिन्यांचा हा प्रकल्प असून, त्यासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद महापालिकेने केली आहे.

Web Title: pune news encroachment on footpath