‘म्हाडा’च्या जागेवर अतिक्रमण

विमाननगर - म्हाडा सोसायटीच्या मैदानात केलेले अतिक्रमण.
विमाननगर - म्हाडा सोसायटीच्या मैदानात केलेले अतिक्रमण.

विमाननगरमधील प्रकार; सोसायटीच्या सार्वजनिक मैदानाचा कुंपण घालून ताबा

वडगाव शेरी - विमाननगर येथे मुलांना खेळण्यासाठी असलेल्या ‘म्हाडा’च्या मालकीच्या जागेवर काही लोकांनी कुंपण घालून अनधिकृतरीत्या ताबा घेतला असून, जागा हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी खेळण्यासाठी गेलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना धमकावण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिक दहशतीखाली असून हे अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी सुमारे दीडशे सह्यांचे निवेदन नागरिकांनी पुणे महापालिका व म्हाडाला दिले आहे. 

विमाननगर येथील शेवटच्या बसथांब्यासमोर ‘म्हाडा’ची सोसायटी आहे. या सोसायटीत सुमारे वीस गुंठे जागा सार्वजनिक वापरासाठी खुली ठेवण्यात आली आहे. त्यातील पाच हजार चौरस फूट जागेला काही लोकांनी कुंपण घालून सोसायटीतील रहिवाशांना धमकी दिली आहे. याविरोधात स्थानिक नागरिकांनी म्हाडाच्या कार्यालयाला आणि अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महापालिकेकडेही निवेदन देऊनही कारवाई झाली नाही. याउलट पुणे महापालिकेने खुल्या जागेवरील अतिक्रमण न हटवता उद्यानाच्या फक्त मोकळ्या जागेवरच पेव्हिंग ब्लॉक बसवले. त्यामुळे ताबा घेतलेल्या लोकांना जागा हडपण्यासाठी मोकळे रान मिळाले.अशोक चव्हाण म्हणाले, ‘‘मुलांना खेळण्याची हक्काची जागा हडपू नये, यासाठी तक्रार केल्यावर मला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसाच प्रकार पुन्हा काल घडला. याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल आहे. येथील गुंडांची दडपशाही यापुढे नागरिक सहन करणार नाही. या अतिक्रणावर कारवाई न झाल्यास स्थानिक रहिवासी आंदोलन करणार आहेत.’’

पोलिस निरीक्षक संजय नाईक म्हणाले, ‘‘कोणी गुंडगिरी करून दहशत माजवत असेल तर पोलिस नक्की कारवाई करतील. नागरिकांनी निर्भीडपणे तक्रार करावी. रविवारी रात्री गुंडांनी स्थानिक नागरिकांना धमकवण्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुंडांचा बंदोबस्त केला जाईल.’’ 

अतिक्रमण करणाऱ्यांची दहशत
हा प्रकार स्थानिक नागरिक अशोक चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला होता. त्यानंतर क्षेत्रीय उपायुक्त वसंत पाटील यांनीही येथे भेट देऊन कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र कारवाई झाली नाही. अतिक्रमण कारवाईची मागणी करण्याच्या संशयावरून रविवारी रात्री जागेवर ताबा मारलेल्या लोकांनी एकाच्या घरात घुसून दमबाजी केली. याविषयी सोमवारी विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
 

अतिक्रमण झालेले आढळल्यास तात्काळ कारवाई करू. अधिकारी व स्थानिक नागरिकांशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com