‘एमए’ संस्कृतसाठी प्रवेश परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पार्श्‍वभूमी नसताना प्रवेशाच्या अवैध मागणीवर उपाय

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात संस्कृत विषयाची पार्श्‍वभूमी नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमए) प्रवेश देण्याची होणारी अवैध मागणी रोखण्यासाठी विद्यापीठ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेणार आहे. प्रवेशासाठी पात्रता निकषाची फेरनिश्‍चितीदेखील केली जाणार आहे.

पार्श्‍वभूमी नसताना प्रवेशाच्या अवैध मागणीवर उपाय

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रात संस्कृत विषयाची पार्श्‍वभूमी नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी (एमए) प्रवेश देण्याची होणारी अवैध मागणी रोखण्यासाठी विद्यापीठ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेणार आहे. प्रवेशासाठी पात्रता निकषाची फेरनिश्‍चितीदेखील केली जाणार आहे.

प्रगत अध्ययन केंद्रात तर्क आणि प्रमाणविद्या हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम तसेच तर्क आणि प्रमाणविद्या, भाषाशास्त्र, हस्ताक्षरशास्त्र आदी प्रमाणपत्र आणि प्रगत पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. यातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी बारावीला संस्कृत विषयात उत्तीर्ण असण्याची अट आहे. परंतु या विषयाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेले अभियांत्रिकी, एमबीए, कला, राज्यशास्त्र शाखेचे विद्यार्थी केवळ जागा रिक्त राहतात म्हणून गेल्या काही दिवसांपासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याची मागणी करीत आहेत. विद्यापीठ मात्र अशा प्रकारे कुणालाही प्रवेश देण्यास अनुकूल नाही. 

संस्कृत विषयाची माहितीच नसेल, तर विद्यार्थी त्यातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करू शकणार नाही, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. 
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता, ते म्हणाले, ‘‘ज्याला संस्कृत विषयच माहीत नाही, त्याला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश का द्यायचा? संस्कृतशी संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पूर्वी पदवीला संस्कृत विषय असणे आवश्‍यक होते. तो नियम शिथिल करून बारावीत हा विषय असावा, अशी अट केली आहे. ती पूर्ण केली पाहिजे. त्यासाठी प्रवेशाच्या पात्रता निकषांची फेरनिश्‍चिती केली जाईल.’’ 

संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रातील प्राध्यापक डॉ. रवींद्र मुळे म्हणाले, ‘‘अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संस्कृत विषयाची पार्श्‍वभूमी असावी, अशी विभागाची ठाम भूमिका आहे. कुलगुरूंबरोबर त्यासंबंधी चर्चा केली आहे. प्रवेश देण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी आहेत, त्यांची गुणवत्ता यादी कोणत्या निकषांवर करायची हा प्रश्‍न आहे. त्यामुळे प्रवेशाच्या पात्रतेचे निकष फेरनिश्‍चित केले जाणार असून, अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा प्रस्तावित केली जाणार आहे.’’

केवळ वसतिगृहासाठीच प्रवेश
संस्कृत विषयाचे ज्ञान नसताना केवळ वसतिगृहाची सुविधा मिळावी आणि विद्यापीठाच्या अन्य सवलती मिळवून स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी प्रगत अध्ययन केंद्रातील अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश मागतात. प्रवेश घेतल्यानंतर ते वर्गात दैनंदिन तासांना उपस्थित राहत नाहीत, परीक्षादेखील देत नाहीत. यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा आणि गुणवत्ता धोक्‍यात येणार आहे, अशी भावना या विभागातील प्राध्यापकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: pune news entrance exam for MA sanskrit