'देशात ग्रीन कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस स्पर्धा'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - ""पर्यावरण संवर्धनासाठी देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर "ग्रीन कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस' स्पर्धा येत्या जानेवारीत घेणार आहे,'' अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली. 

पुणे - ""पर्यावरण संवर्धनासाठी देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयीन स्तरावर "ग्रीन कॅम्पस, स्मार्ट कॅम्पस' स्पर्धा येत्या जानेवारीत घेणार आहे,'' अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केली. 

डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे "स्मार्ट कॅम्पस क्‍लाऊड नेटवर्क'चे उद्‌घाटन जावडेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, "एमआयटी'चे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी एडीटीचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश कराड, सल्लागार डॉ. जय गोरे, प्रा. प्रकाश जोशी, डॉ. मिलिंद पांडे उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, ""या स्पर्धेचा निकाल फेब्रुवारीत घोषित करण्यात येईल. स्पर्धेतून युवक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयाला अनुसरून भारताने पॅरिसमध्ये एक करार केला आहे. त्याचे नेतृत्व भारताकडे असेल. शहरातील मुळा-मुठा नदीचे शुद्धीकरण करून 11 सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येतील. यासाठी केंद्रातर्फे एक हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचे उद्‌घाटन पुढील महिन्यात करण्याचा विचार आहे.'' 
मानवजातीच्या रक्षणासाठी पर्यावरण सुरक्षा महत्त्वाची आहे. वाढत्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने देशातील सर्व उद्योगपतींशी चर्चा केली आहे. देशात कार्बन उत्सर्जन नियंत्रणासाठी आणि वीज, पाणी बचत, हवेतील प्रदूषण नियंत्रण यावर विशेष काम सुरू असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले. 
कराड म्हणाले, ""हा प्रकल्प म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि शाश्‍वत विकास यांचे एकत्रीकरण आहे. त्यामुळे उज्ज्वल भविष्यासाठी जगातील नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पडेल.'' 
पांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.राहुल कराड यांनी आभार मानले. 
............................ 
इन्फो बॉक्‍स- 
अमेरिकेच्या धोरणाबद्दल नाराजी 
""केंद्र सरकार पॅरिस करारावर ठाम आहे. जे कोणी त्यातून बाहेर पडले, ते परत येतील अशी आशा आहे'', असे स्पष्ट करून जावडेकर यांनी करारातून बाहेर पडण्याच्या अमेरिकेच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. 

Web Title: pune news environemnt prakash javdekar