पर्यावरणाच्या दृष्टीने पर्वत महत्त्वाचे - संजीव नलावडे

Mountain
Mountain

पुणे - ‘‘पर्यावरणाच्या दृष्टीने पर्वत महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्यामुळेच आज जगातील हवामानाचा समतोल राखला जात आहे. माणसाने जगातील सर्वच पर्वत पादाक्रांत केले आहेत. पर्वतांमुळेच पर्यावरण अबाधित आहे. त्यामुळे पर्वतांना आज भूराजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे,’’ असे मत पर्यावरणाचे अभ्यासक प्रा. संजीव नलावडे यांनी सोमवारी व्यक्त केले.

जीविधा संस्थेतर्फे ‘पर्वतरांगा शृंखला’ या व्याख्यानमालेत ‘पर्वतांची जडण-घडण आणि वैशिष्ट्ये’ या विषयावर प्रा. नलावडे यांचे व्याख्यान झाले. संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित आणि डॉ. श्रीकांत कार्लेकर उपस्थित होते. 
प्रा. नलावडे म्हणाले, ‘‘पर्वतांची उंची ६०० मीटर ते २ हजार फूट असते. अनेक पर्वतांच्या समान रांगा असतात. पर्वत हे खडकांचे बनलेले असतात. ठिकाण आणि उंचीनुसार तापमान कमी-अधिक होत जाते. पर्वत हे रांगांनुसार आणि एकलही असू शकतात. पर्वत हे सागरतळाशीही सापडू शकतात. सागरी बेटे ही त्याची उदाहरणे आहेत.’’

प्रा. नलावडे म्हणाले, ‘‘जगातील सर्वांत उंच पर्वत शृंखला अटलांटिक येथे असून, ती आइसलॅंड ते अंटार्क्‍टिकापर्यंत आहे. हिमालयात जगातील सर्वांत उंच पर्वत आहेत. पर्वतांमध्येही विविधता दिसून येते. पर्वतांमुळे हवामान आणि पाण्यावर परिणाम होतो. पर्वतांमुळे जंगले अबाधित आहेत. त्यामुळे जैवविविधता टिकून आहे.’’ 

‘भारताच्या दृष्टीने हिमालय खूप महत्त्वाचा आहे. पर्वतांमुळे पावसाचे पॅटर्न तयार झाले आहेत. महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगांमुळे पाऊस पडतो. हिमालयाला ‘वॉटर टॉवर ऑफ आशिया’ असे म्हणतात. पर्वतांच्या प्रदेशात वैविध्यपूर्ण पक्षी, प्राणी आणि वनस्पती सापडतात. यावर अनेक व्यवसायही अवलंबून आहेत,’’ असे प्रा. नलावडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com