तृतीयपंथींशी विवाहाची कोणीच हिंमत करत नाही - दिशा शेख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘‘व्यक्ती कोणत्याही समाजाची असो, त्या व्यक्तीस ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकार दिला पाहिजे. मी काय आहे, हे इतरांनी ठरवू नये किंवा इतर काय आहे, हे आपण ठरवू नये. विधवांच्या पुनर्विवाहासंबंधी अनेक आंदोलने झाली. ती यशस्वीदेखील झाली; मात्र तृतीयपंथींशी विवाह करण्याची कोणाची हिंमत झाली नाही,’’ अशी खंत तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी व्यक्त केली. 

डॉ. अनिता अवचट यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी शेख आणि आनंद निकेतन शाळेचे संस्थापक अरुण ठाकूर यांना स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते ‘संघर्ष सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. लेखक अनिल अवचट, मुक्तांगण मित्र संस्थेचे अध्यक्ष ए. पी. कुलकर्णी, मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी उपस्थित होते. 

शेख म्हणाल्या, ‘‘मुलगा किंवा मुलगी जन्माला आली, की लगेच पेढे अथवा बर्फी वाटण्याची घाई आपल्याकडे होते; पण पालकांनी मूल जन्माला आल्यानंतर दहा ते बारा वर्षांनंतर हा आनंद साजरा करावा. जेणेकरून शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो मुलगा आहे अथवा ती मुलगी आहे, याविषयीच्या भावना आणि जाणिवा त्यांना स्वतःला ओळखून ते व्यक्त करू शकतील. माझ्याबाबतदेखील तेच झाले.’’ 

ठाकूर म्हणाले, ‘‘समाज परिवर्तन करण्याची सध्याची पद्धत वेगळी आहे. कार्यकर्तेसुद्धा अतिउत्साही असतात. आपण हयात आहे, तोपर्यंत सामाजिक बदल झाला पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यांच्या या अपेक्षेपेक्षा आपल्या मर्यादेत आणि कुवतीप्रमाणे जेवढे होईल तेवढे सामाजिक कार्य करावे. समाजात बदल होतो; मात्र तो संथगतीने होत असतो, हा विचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.’’ 

Web Title: pune news eunuch marriage disha shaikh