मांत्रिकाद्वारे रुग्णाला ‘उतारा’ देणाऱ्या डॉक्‍टरला कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिला रुग्णावर मांत्रिकाद्वारे उतारा देणाऱ्या डॉक्‍टरला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पुणे - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिला रुग्णावर मांत्रिकाद्वारे उतारा देणाऱ्या डॉक्‍टरला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

याप्रकरणी डॉ. सतीश चव्हाण (वय ४५, रा. शुक्रवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. मंगेशकर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या संध्या सोनवणे या रुग्णाच्या मृत्युप्रकरणी त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय २२, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी मांत्रिक सचिन सदाशिव येरवडेकर (वय ४८, रा. कसबा पेठ) यास या पूर्वीच अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. तर डॉ. चव्हाण यास गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी डॉ. चव्हाण याला दोन एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

सोनवणे यांच्या छातीमधील दुधाच्या गाठी काढण्यासाठी त्यांना डॉ. चव्हाण याच्या स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होममध्ये दाखल केले होते. तेथे डॉ. चव्हाण याच्यासह अन्य डॉक्‍टरांनी दुधाच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेवेळीच मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे सोनवणे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच डॉ. चव्हाण याने मांत्रिक येरवडेकर याला बोलावून ‘सकाळी सात ते साडेआठ ही वेळ यमाची घंटा आहे’, असे सांगत उतारा केला होता तसेच सोनवणे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना मंत्रपठण करण्यास सांगितले होते. उपचार सुरू असतानाच सोनवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.

Web Title: pune news exorcist patient doctor crime police custody