नेत्रदानात पुणे होतंय ‘डोळस’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

गेल्या वर्षभरात ६४८ जणांना दृष्टी 

पुणे - शहरात नेत्रदात्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पुणे नेत्रदानात ‘डोळस’ होत असल्याचे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात ६४८ अंधांच्या डोळ्यासमोरील अंधार कायमचा दूर झाला असून, या दरम्यान एक हजार ७७० नेत्र संकलीत झाल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या वर्षभरात ६४८ जणांना दृष्टी 

पुणे - शहरात नेत्रदात्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने पुणे नेत्रदानात ‘डोळस’ होत असल्याचे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात ६४८ अंधांच्या डोळ्यासमोरील अंधार कायमचा दूर झाला असून, या दरम्यान एक हजार ७७० नेत्र संकलीत झाल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. रामचंद्र भालचंद्र यांचा जन्म १० जून १९२४ आणि मृत्यू १० जून १९७९ या दिवशी झाला. त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया केल्या. त्यामुळे महाराष्ट्रात दर वर्षी १० जून हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील दृष्टिदानाच्या घेतलेल्या आढाव्यातून ही माहिती पुढे आली आहे. 

वेगवेगळ्या कारणांनी दृष्टी गेलेल्या काही रुग्णांवर नेत्रप्रत्यारोपण हा प्रभावी मार्ग ठरतो. त्यातून त्यांची दृष्टी परत मिळते. त्यासाठी नेत्रदानाबाबत जनजागृती आवश्‍यक असते. नेत्रदानाच्या वाढत्या जनजागृतीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये नेत्र संकलनाचे प्रमाण वाढले आहे, असे निरीक्षण शहरातील नेत्रतज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

शहर आणि जिल्ह्यातील नेत्रपेढ्यांमधील सुमारे वीस नेत्रपेढ्यांमधून गेल्या वर्षभरात एक हजार ७७० नेत्र संकलीत झाले, अशी माहिती राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली. या बाबत जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. व्ही. एन. शिरसीकर म्हणाल्या, ‘‘नेत्रदानाबद्दल समाजात जनजागृती होत आहे. समाजाप्रती असलेले देणे हे नेत्रदानातून आपण फेडू शकतो, याची जाणीव लोकांना करून देण्याची गरज आहे. त्यासाठी नेत्रदानाबाबत जनजागृतीसाठी समुपद्देशक, महिला मंडळ, शाळांमध्ये जाऊन विविध कार्यक्रम राबविले जातात. तसेच नेत्रदानाचे अर्ज भरले जातात.’’

नेत्रतज्ज्ञ डॉ. मंदार परांजपे म्हणाले, ‘‘नेत्रदानाचा अर्ज भरूनही काही व्यक्तींचे नेत्रदान होत नाही. कारण याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना किंवा नातेवाइकांना माहिती नसते. त्यामुळे ज्यांनी नेत्रदानाचे अर्ज भरले आहेत, त्यांनी याबाबतची माहिती कुटुंबीयांना दिली पाहिजे. अर्ज भरलेला नसला तरी रुग्णालयात मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नेत्रदानाचा निर्णय नातेवाइकांना घेता येतो. मृत्यूनंतर तीन ते सहा तासांमध्ये नेत्रदान करणे गरजेचे आहे. तसेच नेत्रदानविषयी विविध माध्यमांतून जनजागृती झाली पाहिजे.’’

डोळ्याच्या बुबुळाला झालेल्या इजेमुळे आलेले अंधत्व नेत्रप्रत्यारोपणातून दूर करता येते. डोळ्याच्या अंतर्गत रचनेला त्यातून धोका पोचलेला नसतो. त्यामुळे नेत्रप्रत्यारोपणातून रुग्णाला निश्‍चित दृष्टी मिळते. पण, जन्मतः अंध असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी यात मर्यादा पडतात. 
- डॉ. श्रीकांत केळकर, नेत्रतज्ज्ञ, राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्था

Web Title: pune news eye donation