पुण्यात शेतमालाची आवक निम्म्यावर; भाव वाढले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

मालाची आवक रोजच्यापेक्षा निम्म्याने घटली आहे. भाज्यांचे भाव वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागत आहे. तीन-चार रुपयांच्या पुदिन्याच्या गड्डीची खरेदी किंमत वीस रुपये आहे. त्यामुळे ग्राहकांना पंचवीस-तीस रुपयांना एक गड्डी विकावी लागत आहे.
- नीतेश कोल्हे, विक्रेता

पुरवठादारांकडून मागणीमुळे भाव तीस टक्‍क्‍यांनी वाढले

पुणेः शहराचा भाजीपाला पुरवठा गुरुवारी विस्कळित झाला. कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव मिळावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बाजार समितीच्या बाजारातील शेतमालाची आवक निम्म्याने घटली. त्यामुळे घाऊक बाजारात फळभाज्या, पालेभाज्यांचे भाव 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. संपाचा प्रभाव वाढल्यास उद्या (शुक्रवारी) आवक आणखी घटण्याची शक्‍यता अडत्यांनी व्यक्त केली असून, दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

दरम्यान, बाजार समितीमध्ये गुरुवारी राज्याबरोबर परराज्यातून सरासरी आवकेच्या 50 टक्के म्हणजे अवघी 40 ते 45 ट्रक आवक झाली होती. कमी आवक घटल्याने आणि मालाला मागणी असल्याने शेतमालाच्या दरात 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाल्याचे ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी सांगितले.

शेतमाल विक्रीसाठी अडते सज्ज
ज्येष्ठ अडते विलास भुजबळ म्हणाले, ""शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर शेतमालाची निम्मीच आवक झाली. गुरुवारी सरासरी 70 ते 80 ट्रक आवक होत असते. मात्र, आज केवळ 40 ते 45 ट्रक आवक झाली. कमी आवक आणि विविध संस्थांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडून खरेदी होत असल्याने दरात 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली होती. यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार सकाळी लवकरच संपले होते. शनिवारी (ता. 3) बाजार समिती साप्ताहिक

बंद आणि संप सुरू असल्याने शुक्रवारी (ता. 2) शेतमालाला चांगली मागणी असणार आहे. आवक कमी झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.'' शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस आणल्यास विक्रीची जबाबदारी आमची असून, सर्व अडते त्यासाठी सज्ज आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या आणि
संपाला अडते असोसिएशनचा पाठिंबा असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

हॉटेल, खानावळींना फटका
हॉटेल, खानावळ, कंपन्यांचे कॅन्टीन आदी ठिकाणी पुरवठा करणाऱ्यांना आज पुरेशा प्रमाणात माल उपलब्ध झाला नाही. त्यामुळे उपलब्ध माल वाढीव भावाने खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर आली. लष्कराच्या विविध संस्थांत पुरवठा करणारे ठेकेदार इम्रान शेख म्हणाले, ""दररोज तीन ते चार टन भाजीपाला खरेदी करावा लागतो, आज दोन टनच माल मिळू शकला. संप लवकर मिटला नाही तर आम्ही पुरवठा करू शकणार नाही.'' घाऊक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ विक्रीच्या भावात वाढ होऊ लागली आहे. फळभाज्यांचे भाव प्रतिकिलोमागे पाच रुपयांनी वाढले, पालेभाज्यांचे भाव भडकले. कोथिंबीर, मेथीची जुडी 25 ते 30 रुपये आणि इतर पालेभाज्यांची जुडी 15 ते 20 रुपयांना विकली जात आहे, असे विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी नमूद केले.

किरकोळ विक्रेत्यांची अडचण
महात्मा फुले मंडई व्यापारी संघटनेचे चिटणीस प्रमोद शिर्के म्हणाले, ""संपामुळे खरी अडचण किरकोळ विक्रेत्यांची आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भाजीपाला रास्त दरात ग्राहकांना विकून आमचा उदरनिर्वाह चालतो. पण संपामुळे वीस रुपये किलोचा माल चाळीस रुपये किमतीने उचलावा लागतोय. वाहतूक आणि मोबदल्याचा विचार केल्यास ग्राहकाला पंधरा ते वीस रुपये अधिक दराने मालाची विक्री करावी लागत आहे. तुमच्या जबाबदारीवर थेट शेतातून माल आणून विक्री करा, असे शेतकरी सांगत आहेत. पण आम्हाला हे शक्‍य नाही. मंडईत अडीचशे व्यापाऱ्यांचे गाळे आहेत. प्रत्येकाला शेतातून माल उचलणे अशक्‍य आहे. त्यातच पालेभाज्या, फळे हा नाशवंत माल आहे. गवार, फ्लॉवर, कोथिंबीर, टोमॅटो या भाज्यांनाही उठाव नाही.''

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: pune news farmer strike and vegetables rates