शहराच्या भाजीपाला पुरवठ्याचे चित्र संपाच्या प्रतिसादावर अवलंबून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

पुणे - शेतमालाला हमीभाव आणि कर्जमुक्ती या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला किती प्रतिसाद मिळतो, यावरच शहराच्या भाजीपाला पुरवठ्याचे चित्र अवलंबून आहे. गुरुवार (ता. 1) पासून हा संप सुरू होणार असला, तरी याचे प्रत्यक्ष परिणाम हे शनिवारपासून दिसू लागतील.

पुणे - शेतमालाला हमीभाव आणि कर्जमुक्ती या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला किती प्रतिसाद मिळतो, यावरच शहराच्या भाजीपाला पुरवठ्याचे चित्र अवलंबून आहे. गुरुवार (ता. 1) पासून हा संप सुरू होणार असला, तरी याचे प्रत्यक्ष परिणाम हे शनिवारपासून दिसू लागतील.

संप सुरू होणार असल्याने आज बाजारातील आवक वाढेल, असा अंदाज होता. परंतु भाजीपाल्याची नियमित आवक झाली आहे. रात्री काही शेतकऱ्यांनी भाजीपाला पाठवला होता, त्यामुळे त्याची उद्या विक्री होईल. शहरातील किरकोळ विक्रेत्यांनी आवश्‍यक त्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करून ठेवला असला, तरी गुरुवारीदेखील त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाऊ शकते. त्यांच्याकडे माल साठविण्याच्या मर्यादा असल्याने दोन ते तीन दिवसच तो पुरवठा राहू शकतो. शेतमालाची वाहतूक रोखली, तर त्याचाही परिणाम पुरवठ्यावर होईल.

पणन मंडळाच्या सहकार्याने शहराच्या विविध भागांत ठराविक दिवशी आठवडे बाजारात भाजीपाला विक्री होते. हे आठवडे बाजार सुरू राहणार आहेत, अशी माहिती पणन मंडळाच्या सूत्रांनी दिली. या आठवडे बाजारात सहभागी झालेल्या शेतकरी गटांनी संपाविषयी कोणतीही भूमिका घेतलेली नाही, तसेच त्याविषयी आम्हाला कोणतीही माहिती दिलेली नाही, असेही सूत्रांनी नमूद केले. त्यामुळे आठवडे बाजारातूनही नागरिकांना भाजीपाला उपलब्ध होऊ शकतो. उपनगरात काही ठिकाणी शहराजवळील गावातील भाजीपाला उत्पादक थेट विक्री करतात. ते या संपात सहभागी होणार की नाही याबाबतचे चित्र दोन दिवसांत स्पष्ट होईल. भाजीपाला पुरवठा विस्कळित झाल्यास भाववाढीचा धोका आहे. भाजीपाल्याबरोबरच दूधपुरवठाही थांबविण्याचा इशारा आंदोलनकांनी दिला आहे. पुण्यात प्रतिदिन 15 लाख लिटर दूध विक्री होते. त्यापैकी पाच लाख लिटर दूध हे पुणे जिल्ह्यातूनच गोळा केले जाते, उर्वरित दूध इतर जिल्ह्यातून येते. दूध वाहतूक सुरळीत राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'शेतकऱ्यांनी माल आणला तर विक्री करावीच लागेल. संपाला किती प्रतिसाद मिळतो, यावर पुढील उपाययोजना कराव्या लागतील. या परिस्थितीचा अंदाज घेऊन शेतमालाच्या विक्रीची व्यवस्था करू.''
- दिलीप खैरे, मुख्य प्रशासक, बाजार समिती

'शेतकऱ्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे; परंतु उद्या (गुरुवार) बाजारात शेतकऱ्यांनी माल आणला, तर त्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्या मालाची विक्री करणार आहोत.''
- शिवलाल भोसले, अध्यक्ष, अडते असोसिएशन

मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात होणारी प्रतिदिन सरासरी आवक
* भाजीपाला : 60 ते 80 ट्रक.
* बटाटा : 40 ते 50 ट्रक
* कांदा : 70 ते 80 ट्रक
* पालेभाज्या : सध्या तापमानामुळे पालेभाज्यांची आवक कमी
* परराज्यांतून हिरवी मिरची, कोबी, मटार, गाजर, शेवगा यांची मर्यादित आवक

Web Title: pune news farmer strike effect on vegetable supply