बारामती तालुक्यात भोंडवेवाडीत शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

सुप्रिया सुळे यांच्याकडून सांत्वन 
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुप्यातील ग्रामिण रूग्णालयात शिंदे यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. मुलींच्या शिक्षणाची काळजी करू नका असे सांगून धीर दिला. सरकारने तातडीने शेतीकर्ज माफीचा निर्णय घेऊन, शेतीमालाला हमीभाव देण्याची गरज व्यक्त केली.

सुपे : भोंडवेवाडी (ता. बारामती) येथील हनुमंत पांडुरंग शिंदे (वय 48) या शेतकऱ्याने किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी निदर्शनास आली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या काळात कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करण्याची तालुक्‍यातील ही चौथी घटना आहे. 

या घटनेची खबर हनुमंत शिंदे यांचे बंधू सुनील पांडुरंग शिंदे यांनी दिली. मध्यरात्री दीडच्या सुमारास शिंदे यांच्या मुलीला जाग आली तेंव्हा शिंदे घरात नव्हते. त्यांचा शोध घेतला असता, जवळच असलेल्या दिपक भोंडवे यांच्या शेतात गुरूवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. शेती कर्ज व मुलीच्या लग्नाविषयी गेल्या आठवड्यात बंधूनी चर्चा केल्याचे दिलेल्या खबरीत म्हटले आहे. 

मयत शिंदे अत्यल्पभूधारक शेतकरी असून यांना दोन एकर शेती आहे. या शेतीसाठी भोंडवेवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून व येथील बचत गटाकडून कर्ज घेतले आहे. त्यांच्यामागे आई-वडिल, पत्नी, लहान मुलगा, तीन मुली पैकी एक विवाहीत आहे. तर एका मुलीच्या लग्नाबाबत बोलणी झाली होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मालकीच्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. वृद्ध आई-वडिल त्यांचे आजारपण या सगळ्या गोष्टींचा ताण असल्याने त्यांनी जीवन संपवले असावे अशी माहिती नातेवाईकांनी दिली. पुढील तपास फौजदार ए. एन. जाधव करीत आहेत. 

सुप्रिया सुळे यांच्याकडून सांत्वन 
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुप्यातील ग्रामिण रूग्णालयात शिंदे यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे, पंचायत समितीच्या सदस्या नीता बारवकर आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: pune news farmer suicide baramati news, supriya sule