सरकार न घाबरल्याचा आव आणतंय- राजू शेट्टी #शेतकरीसंपावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

सरकार एकीकडे आंदोलनाच्या काळात तीनशेहून अधिक बाजार समित्या सुरू असल्याचे सांगते तर दुसरीकडे या आंदोलनादरम्यान दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगते सरकारचा हा दुटप्पीपणा शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे.
-खासदार राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

उदापूर : शेतकऱ्यांच्या संपामुळे सरकार अडचणीत आले असून घाबरले आहे. मात्र ते न घाबरल्याचा आव आणते आहे, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी भाजप सरकारचा समाचार घेतला. कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळेच शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन त्याची परिणती संपात झाली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी सरकारने लागू केल्या असत्या तर शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळच आली नसती. सरकारच्या दुटप्पी धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

पिंपरीपेंढार (ता. जुन्नर) येथे शेतकरी संपादरम्यान गुन्हा दाखल झालेल्या 58 शेतकऱ्यांची, तसेच संपकरी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी ते बुधवारी रात्री 11 वाजता आले होते. 
शेट्टी म्हणाले, "सरकार एकीकडे आंदोलनाच्या काळात तीनशेहून अधिक बाजार समित्या सुरू असल्याचे सांगते, तर दुसरीकडे आंदोलनादरम्यान 278 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगते. सरकारचा हा दुटप्पीपणा शेतकऱ्यांच्या लक्षात आला  आहे.'' 

शेतीमालाचा भाव सरकार पाडत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, "शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. शेतकऱ्यांवर आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले असून माझ्यावरही 32 गुन्हे दाखल आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता न्याय्य हक्कासाठी लढा चालू ठेवला पाहिजे. गेल्या साठ ते सत्तर वर्षांत फक्त तीनवेळाच कर्जमाफी झाली आहे. सरकार अंबानी आणि अदानींना सवलती देते, विजय मल्ल्या कर्ज बुडवून तिकडे क्रिकेटचे सामने पाहात मजा करत आहे आणि आमचा शेतकरी मरतोय, त्याचे सरकारला काहीच वाटत नाही. कर्जमाफी हा आमचा हक्क आहे आणि आम्ही तोच मागत आहोत.'' 

यावेळी सतीश काकडे, आशाताई बुचके, माऊली खंडागळे, प्रकाश बालवडकर, रोहिदास वेठेकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ, राजेंद्र ढोमसे, बापूसाहेब कारंडे, रमेश कोल्हे, अजित वाघ, आंबादास हांडे, कैलास लेंडे, कुलदिप काकडे, नवनाथ वाघ व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन माऊली कुटे यांनी केले तर आभार राहिदास महादू कुटे यांनी मानले.

Web Title: pune news farmers strike fadnavis govt pretend raju shetti