जुन्नरला 120 संस्थांचे दूधसंकलन बंद

जुन्नरला 120 संस्थांचे दूधसंकलन बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पोलिस संरक्षणानंतरही नारायणगाव उपबाजारात लिलाव ठप्प 

नारायणगाव : व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी जुन्नर बाजार समितीच्या येथील उपबाजारात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी उपबाजारात फळ व भाजीपाला विक्रीसाठी आला नाही. शेतकऱ्यांनी दूध संस्थांकडे पाठ फिरवल्याने तालुक्‍यातील एकशेवीस दूध संस्थांनी शुक्रवारी दूधसंकलन बंद ठेवले.

जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव, ओतूर उपबाजारात रोज भाजीपाल्याचे लिलाव होतात. आळेफाटा येथील उपबाजारात कांदा व डाळिंबाचे लिलाव होतात. येथील उपबाजारात खरेदी विक्रीतून रोज सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल होते. एक जूनपासून शेतकऱ्यांनी बंद पुकारल्याने गेल्या दोन दिवसांत येथील उपबाजारात शेतकऱ्यांनी फळ व भाजीपाला विक्रीसाठी आणला नाही. यामुळे बाजार समितीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. व्यापाऱ्यांनी नारायणगाव उपबाजारात 31 मे रोजी टोमॅटो खरेदी केली होती. आंदोलकांनी महामार्गावर ट्रक अडवून क्रेटसह टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सरकारने पोलिस बंदोबस्त ठेवला असला तरी संपाबाबत तोडगा निघेपर्यंत शेतीमाल खरेदी न करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. शेतकरी संपाची झळ ट्रकचालक व मालकांनासुद्धा बसली आहे, अशी माहिती व्यापारी जालिंदर थोरवे, सारंग घोलप यांनी दिली.

शेतीमालाचा झाला बदला
तोडणीस असलेला टोमॅटो, भोपळा, कारली, काकडी, दोडका आदींची तोडणी न केल्याने शेतीमालाचा झाडावरच बदला झाला आहे. यामुळे पिकेसुद्धा धोक्‍यात आली असून, शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. चार महिने कष्ट करून जोपासलेल्या पिकांचे नुकसान होत असले तरी शेतकरी आपल्या भूमिकेशी ठाम असल्याचे चित्र आहे.

रमेश हांडे (शेतकरी क्रांती मोर्चा, जिल्हा समन्वयक) : तालुक्‍यातील शेतकरी पुणे-नाशिक व नगर-कल्याण महामार्गावर रात्रंदिवस पहारा ठेवून आहेत. या महामार्गावरून एकही फळ व भाजीपाल्याची ट्रक, दुधाचा टॅंकर जाऊ दिला जाणार नाही. व्यापाऱ्यांनी प्रयत्न केल्यास होणाऱ्या नुकसानास प्रशासन जबाबदार राहील. सरकारचे शेतकऱ्यांबाबतचे धोरण उदासीन व दुटप्पी आहे. बाजारभावाचा अभाव व नैसर्गिक आपत्तीमुळे गेले दोन वर्षे शेतकरी अडचणीत असताना सरकारने याकडे डोळेझाक केल्याने बळिराजाला हा कठोर निर्णय घ्यावा लागला.

बाळासाहेब खिलारी (संचालक, जिल्हा दूध संघ कात्रज) ः जुन्नर तालुक्‍यात 120 दूध उत्पादक संस्था आहेत. रोज सुमारे दोन लाख लिटर दुधाचे संकलन होते. या पैकी 45 हजार लिटर दूध कात्रज संघाला (जिल्हा दूध संघ) दिले जाते. उर्वरित दूध खासगी प्रकल्प खरेदी करतात. गेली दोन दिवस दुधाचे संकलन बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने निर्णय घेणे आवश्‍यक आहे.

Web Title: pune news farmers strike Junnar milk collection shut