स्थूल महिलांचाही सन्मान व्हावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 जून 2017

‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन’ची मानकरी पायल सोनी हिची भावना

पुणे - ‘‘रॅम्पवर प्रवेश केला तर कोणीही मी स्थूल आहे या नजरेने पाहत नाही. उलट टाळ्या वाजवून प्रोत्साहित करतात. स्थूल असलो तरी काय झाले? आम्हाला कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. फक्त समाजाचा दृष्टिकोन बदलावा. स्थूल महिलांचाही आदर आणि सन्मान केला पाहिजे,’’ असं पायल सोनी सांगत होती.

‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन’ची मानकरी पायल सोनी हिची भावना

पुणे - ‘‘रॅम्पवर प्रवेश केला तर कोणीही मी स्थूल आहे या नजरेने पाहत नाही. उलट टाळ्या वाजवून प्रोत्साहित करतात. स्थूल असलो तरी काय झाले? आम्हाला कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. फक्त समाजाचा दृष्टिकोन बदलावा. स्थूल महिलांचाही आदर आणि सन्मान केला पाहिजे,’’ असं पायल सोनी सांगत होती.

विशीतल्या या तरुणीने फॅशन शोमध्ये सहभाग घ्यायला सुरवात केली आणि ती त्या क्षेत्रात अव्वल ठरली. ती स्थूल आहे म्हणून समाज टोमणे मारत असतो, ते आजही बंद झालेले नाहीत; पण सकारात्मक जगण्याने तिने तिच्या आयुष्याला एक दिशा दिली आणि आज उत्तम अभिनेत्री, मॉडेल बनली आहे. तिने नुकतेच ‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन-२०१७’चा किताबही पटकावला आहे, तर विवाहित महिलांच्या गटाचे विजेतेपद मोनिका डुलारे यांनी मिळवला. यानिमित्त ‘सकाळ’ने या दोघींशी संवाद साधला.

‘फोर्थ डायमेंशन मीडिया’ आणि ‘स्टुडिओ स्ट्रॅंडस्‌ सलोन’तर्फे ही सौंदर्यवती स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून स्थूल महिला-तरुणींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या समीरा ठोंबरे आणि सुमेधा सॅलियन यांनीही स्थूल महिलांचे जगणे, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि या स्थूल महिलांनी जगण्यात कशी सकारात्मकता आणावी, याविषयी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.

माणूस म्हणून पाहा..
डुलारे म्हणाल्या, ‘‘स्थूल महिलांमध्ये खुपसे आजार असतात, हा समजही साफ चुकीचा आहे. स्थूल महिलांनी फिटनेस राखला तर त्यांना आरोग्याच्या समस्या उद्‌भवत नाहीत. स्वतःवर प्रेम करायला शिकलो, तर स्थूलता ही अडचण बनत नाही. स्थूल महिलाही मॉडेलिंग, रॅम्प वॉक, अभिनय, व्यवसाय करू शकतात. फक्त त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता माणूस म्हणून पाहावे.’’

स्वतःला सुंदर समजून जगा
समीरा आणि सुमेधा म्हणाल्या, ‘‘स्थूल महिलाही स्वतःला उत्तमरीत्या कॅरी करू शकतात, हे आम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे त्या कशा जगत असतील, जगण्यात किती मर्यादा असतील हा विचार करणे सोडून द्यावे. स्थूलतेचा संबंध जगण्याशी नसतो. सकारात्मक जीवनशैली आणि स्वतःला सुंदर समजून जगलात तर कोणीही तुम्हाला कमी लेखू शकत नाही.’’

मी अनेक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला आहे. त्यातून मी समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. स्थूल महिलाही अगदी सौंदर्य स्पर्धेपासून ते मॉडेलिंगपर्यंत सर्व क्षेत्रांत काम करू शकतात. समाजाची तमा न बाळगता सकारात्मक जगलो की सर्व अडचणी दूर होतात. त्यासाठी स्वतःवर प्रेम केले पाहिजे.
- पायल सोनी, विजेती ‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन-२०१७’ स्पर्धा

स्थूल महिलांसाठीच्या कपड्यांचे प्रदर्शन
‘फोर्थ डायमेंशन मीडिया’तर्फे ‘वॉक ऑफ कर्वीस्‌’ हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यात फॅशन शो आणि स्थूल महिलांसाठीच्या कपड्यांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. हा उपक्रम जुलैमध्ये मुंबई, पुणे, बंगळूर आणि दिल्ली येथे होणार आहे,’ असे त्रिशला राणे यांनी सांगितले.

Web Title: pune news fat Gross women should be respected