फर्ग्युसन रस्त्यालगत अतिक्रमण कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

पुणे - शहरातील अधिकृत फेरीवाले, पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचे नियोजन केल्यानंतर वर्दळीच्या रस्त्यांवर बेकायदा दुकाने मांडणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने बुधवारी कारवाई सुरू केली आहे. त्यात फर्ग्युसन रस्त्यालगतच्या पदपथावरील पथारी व्यावसायिकांसह येथील हॉटेलचालकांनी उभारलेले शेड आणि छत काढण्यात आले. काही व्यावसायिकांनी विरोध केल्याने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई झाली.

या रस्त्यावरील व्यावसायिकांनी केलेले बेकायदा बांधकाम, शेड, फलक काढण्यात आले. या कारवाईत सुमारे सात हजार चौरस फूट जागेवरील बांधकामे पाडण्यात आली. येथील सर्व अतिक्रमणे काढण्यात येत आहेत, तीत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी स्पष्ट केले. 

शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधील अतिक्रमणे काढण्याची मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हाती घेतली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू आहे. परंतु, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यासह डेक्कन परिसरात बेकायदा हातगाडी, फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असून, पादचाऱ्यांना  रस्त्यावरून चालणे अशक्‍य झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर अतिक्रमणे काढतानाच, अधिकृत फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्यासाठी नवी नियमावली तयार केली. तिची अंमलबजावणी होणार असल्याने अतिक्रमणे हटविण्यात येत आहेत. अतिक्रमण विभागासह बांधकाम आणि आकाशचिन्ह विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. 

जगताप म्हणाले, ‘‘संपूर्ण शहरातील अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. विशेषतः बेकायदा हातगाडी, फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांवर कारवाई करून रस्ते, पदपथ मोकळे केले जात आहेत. जवळपास ४० बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई केली असून प्रभावीपणे कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.’’ दरम्यान, येथील वैशाली आणि रूपाली हॉटेलच्या आवारातील अतिक्रमणे काढण्यात आली.

Web Title: pune news FC Road Encroachment