भुलीचे इंजेक्‍शन उपलब्ध - एफडीए 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

पुणे - शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूल देण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्‍शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) गुरुवारी देण्यात आली. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधील थांबलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होतील, असा विश्‍वासही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

पुणे - शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भूल देण्यासाठी वापरण्यात येणारी इंजेक्‍शन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) गुरुवारी देण्यात आली. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधील थांबलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा सुरू होतील, असा विश्‍वासही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

भुलीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्‍शनची खरेदी घाऊक औषध विक्रेत्यांनी थांबविली होती. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधील कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. कंपनीतर्फे औषध विक्रीची सातत्याने मागविण्यात येत असलेली माहिती आणि दुसरीकडे "एफडीए'कडून होणारी तपासणी यामुळे औषध विक्रेत्यांनी याची खरेदी थांबविली होती. याबाबतचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर "एफडीए' आणि औषध कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. औषध वितरकांना इंजेक्‍शनचा पुरवठा केला असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर हा साठा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना "एफडीए'ने दिल्या आहेत. याबाबत "एफडीए'च्या पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर म्हणाले, ""भुलीच्या इंजेक्‍शनचा शहरात आता पुरेसा साठा उपलब्ध आहे. घाऊक औषध विक्रेत्यांनी नियमानुसार त्याचे वितरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयांनी केलेल्या मागणीनुसार औषध उपलब्ध होईल.'' 

सरकारी रुग्णालयांना औषध उपलब्ध झाल्याची माहिती कळविण्यात आली आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी लागणारे भुलीचे इंजेक्‍शन खरेदी करण्यासाठी निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे रुग्णालयाने मागणी केल्यास घाऊक औषध विक्रेत्यांकडून इंजेक्‍शन मिळेल, अशी माहिती देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

इंजेक्‍शनची खरेदी सुरू केल्याने कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया नियमित सुरू होतील, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: pune news fda anaesthetize