फीडर पिलर वाऱ्यावरच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पुणे - महावितरणच्या बहुतांश फीडर पिलरची झाकणे आजही उघडीच आहेत. काही ठिकाणी केबल रस्त्यावरच पडून आहेत. उपनगरांत भूमिगत वायरिंगचे कामही रखडलेले असून, ओव्हरहेड वायरिंग हीदेखील समस्या आहेच. काही भागात रस्त्यावरच केबल पडून असल्याने नागरिकांना ये-जा करणेही अवघड होते. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांचे होणारे घर्षण, रस्त्यावर तारा लोंबकाळणे, फीडर पिलरमध्ये पाणी शिरणे यांसारख्या घटना घडून एखादी दुर्घटनाही होऊ शकते.

पुणे - महावितरणच्या बहुतांश फीडर पिलरची झाकणे आजही उघडीच आहेत. काही ठिकाणी केबल रस्त्यावरच पडून आहेत. उपनगरांत भूमिगत वायरिंगचे कामही रखडलेले असून, ओव्हरहेड वायरिंग हीदेखील समस्या आहेच. काही भागात रस्त्यावरच केबल पडून असल्याने नागरिकांना ये-जा करणेही अवघड होते. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारांचे होणारे घर्षण, रस्त्यावर तारा लोंबकाळणे, फीडर पिलरमध्ये पाणी शिरणे यांसारख्या घटना घडून एखादी दुर्घटनाही होऊ शकते.

पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची ऐंशी टक्के कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महावितरणच्या पुणे परिमंडलचे तत्कालीन अभियंता रामराव मुंडे यांनी दिले होते; परंतु तरीही शहर व उपनगरांमध्ये फेरफटका मारल्यावर खराब झालेले फीडर पिलर जागोजागी दिसतात. पुष्कळशा फीडर पिलरचे पत्रेही गंजलेले आहेत, तर दरवाजे अर्धवट तुटलेले आहेत.

अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या विजेच्या तारा, खांब, फीडर पिलर, रोहित्रांवरील (ट्रान्सफॉर्मर) लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्‍स्‌ला धोका निर्माण होऊ शकतो. रोहित्रांमध्ये ठिणग्या पडून बिघाड झाल्यास एखादा अपघात घडू शकतो. शहराचा मध्यवर्ती भाग असो की उपनगरे. पहिल्या पावसात दरवेळेस वीज जाण्याची घटना हमखास घडतेच. पावसाळ्यापूर्वी सावधानतेचा इशारा महावितरणकडून देण्यात येत असला, तरीही देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत आणि दर्जेदार होणे अत्यावश्‍यक आहे; परंतु चांगल्या दर्जाची कामे अभावानेच दिसून येतात. नदीपात्रालगत राहणारे नागरिक किंवा पत्र्याच्या घरातील नागरिकांना त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. 

शहरातील सतरा पेठांसह बाणेर, बालेवाडी, कात्रज, मुंढवा, कोंढवा, घोरपडी, कर्वेनगर, वारजे, उत्तमनगर, शिवणे, हडपसर, उंड्री, पिसोळी, औंध, आंबेगाव बुद्रुक, बिबवेवाडी, धनकवडी आणि अन्य उपनगरांमध्येही पावसाळ्यात पाण्याची गटारे तुंबतात. ट्रान्स्फॉर्मरमध्ये पाणी शिरून ते बंद पडू शकतात; पण महावितरण करीत असलेले देखभाल दुरुस्तीचे काम वेगाने होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करतात. शहरातही सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ यासारख्या पेठांमधून फेरफटका मारताना फीडर पिलरकडे लक्ष जाते. काही ठिकाणी तर अडगळीच्या जागेत फीडर पिलर बसविले आहेत. त्यावरच नागरिकही कपडे, पोती वाळत घालतात. जाहिराती लावतात. त्यामुळे फीडर पिलर दिसत नाही. परिणामी, अंधारात ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना जीव मुठीत धरून जावे लागते. माडीवाले कॉलनी, विजयानगर कॉलनी, दत्तवाडी, शास्त्री रस्ता अशा अनेक भागांतील फीडर पिलरही खराब झालेले आहेत.   

पहिल्या पावसात दरवर्षी वीज जाण्याच्या घटना घडतात. त्यामुळे या वर्षी पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवली आहे. पुणेकरांना अंधारात राहायला लागू नये, यासाठी महावितरणतर्फे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. बाणेर, बालेवाडी, सिंहगड रस्ता येथील फीडर पिलरच्या दुरुस्तीची कामे झाली आहेत. शहराच्या अन्य भागातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील.  
- एम. जी. शिंदे, मुख्य अभियंता, पुणे परिमंडळ.

Web Title: pune news fidder piller open