एकाच फिल्म फेस्टिव्हलला कोट्यवधींचा निधी नको 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - ""एकाच फिल्म फेस्टिव्हलला कोट्यवधी रुपयांचा निधी देऊ नका. त्यापेक्षा जिल्हा पातळीवरील वेगवेगळ्या "फिल्म क्‍लब'ला निधी देऊन त्यांना बळकट करा,'' अशी मागणी फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया पत्राद्वारे राज्य सरकारकडे करणार आहे. 

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) नुकताच झाला. या महोत्सवाला सरकारकडून 70 लाख रुपयांचा निधी मिळतो; पण तो वाढवून दोन कोटी रुपये करावा, अशी मागणी "पिफ'चे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी महोत्सवादरम्यान सरकारकडे केली होती. या मागणीवर फेडरेशनने आक्षेप घेतला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, सचिव सुधीर नांदगावकर, पश्‍चिम विभाग सदस्य वीरेंद्र चित्राव हे पत्र पाठवून राज्यभरातील वेगवेगळ्या "फिल्म क्‍लब'ला निधी मिळावा, याकडे सरकारचे लक्ष वेधून घेणार आहेत. 

चित्राव म्हणाले, ""एकाच महोत्सवाला भरघोस निधी देण्यापेक्षा राज्यात 60 फिल्म क्‍लब आहेत. त्यांना चित्रपट महोत्सवासाठी सरकारने निधी द्यायला हवा. हे फिल्म क्‍लब चित्रपट प्रसाराचे काम करत आहेत. त्यांना सरकारने बळ दिले तर चित्रपट संस्कृती, चित्रपट साक्षरता वाढण्यास मदत होईल.'' 

मोठे फ्लेक्‍स, अधिकाधिक स्क्रीन असा भपकेबाजपणा टाळून कमी पैशांत महोत्सव होतो. आशियाई चित्रपट महोत्सव हा तर साडेतीन लाख रुपयांत होतो. हा निधी सरकारनेच आम्हाला दिला आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: pune news film festival fund