आगीमुळे संसार उघड्यावर... औंधमधील आगीत सतरा घरे जळून खाक

fire
fire

औंध - परिसरातील पडळ वस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाली. यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. या आगीत संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे इत्यादी जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

रंजना काळे यांच्या घराला प्रथम ही आग लागली. त्यानंतर ती इतर घरांना लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संजय कांबळे यांचे मंडप व डेकोरेशनचे गोदाम जळून सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. आगीत नुकसान झालेली सर्व कुटुंबे मोलमजुरी करणारी असून त्यांचे सर्वांचे संसार उघड्यावर आले आहेत.

आग लागलेल्या ठिकाणी दाटीवाटीने घरे उभारली असल्याने घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब पोचण्यास व्यत्यय निर्माण झाल्याने सतरा घरे भस्मसात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र अग्निशामक दलाची गाडी उशिरा आल्यामुळे आग आटोक्‍यात आणण्यास उशीर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आगीचे स्वरूप मोठे असल्याने ती आटोक्‍यात आणणे शक्‍य झाली नाही. तोपर्यंत डोळ्यासमोर स्वतःची घरे जळताना पाहावी लागल्याचे या कुंटुबांतील महिलांनी सांगितले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत वीजपुरवठा खंडित केल्याने मोठा अनर्थ टळल्याचेही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या दुर्घटनेत संजय कांबळे, वंदना यादव, रामभाऊ अडागळे, सुरम्मा भोई, विलास केदारी, मंगल अशोक चव्हाण, श्रीकांत गायकवाड, राजकुमार भालेराव, जयवंत साठे, रंजना काळे, नंदा माने, सोमनाथ जाधव, कलावती दुर्वेल्लू, रवींद्र कांबळे, जितेंद्र कांबळे, रेखा गायकवाड, शोभा जाधव, शशिकला पाटोळे, अनिल मोहिते यांची घरे जळाली आहेत.

रंजना काळे यांच्या घरापासून ही आग सुरू झाली. काही कळायच्या आत ती सर्वत्र पसरली. त्यामुळे ती आटोक्‍यात आणणे अवघड झाले. घरांमधील सर्व कुटुंबीय आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पडले. आर्थिक नुकसानासह घरे नष्ट झाल्याने जगावे कसे, असा प्रश्‍न आमच्यासमोर निर्माण झाला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना मदत करावी.
-संजय कांबळे, आगीतील नुकसानग्रस्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com