शिवणे-खराडी रस्त्यासाठी पाच अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

पुणे - रखडलेल्या शिवणे-खराडी रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या पाच विभागांमधील प्रत्येकी एका अधिकाऱ्याची ‘नोडल ऑफिसर’ म्हणून नियुक्ती करण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला केली. तसेच या रस्त्याबाबत ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळा-मुठा नदीच्या पात्राजवळून जाणाऱ्या सुमारे १७ किलोमीटर अंतराच्या शिवणे-खराडी रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे.

महापालिकेने त्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, फक्त नऊ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित आठ किलोमीटर रस्ता भूसंपादन न झाल्यामुळे रखडला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर टिळक यांनी आयोजित केलेल्या बैठकीस नगरसेवक मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, दीपक पोटे, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी, सुशील मेंगडे, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शिवणे-खराडी रस्त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रकरणे सध्या रखडली आहेत. हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होण्यास प्रदीर्घ कालावधी लागत असून महापालिकेतील विविध विभागांमधील समन्वयाअभावी भूसंपादन रखडले असल्याचे संबंधित नगरसेवकांनी नमूद केले. त्यामुळे पथ विभाग, भूसंपादन विभाग, बांधकाम नियंत्रण, विकास आराखडा आणि विधी विभाग यांचे प्रत्येकी एक अधिकारी या रस्त्यासाठी नियुक्त करावेत, अशी सूचना महापौरांनी केली. तसेच मार्च २०१८ पर्यंत हा रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले.

राजाराम ते म्हात्रे पूल रस्ता दोन महिन्यांत पूर्ण
राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या रस्त्यावर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या भागातील रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. हा रस्ता दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे पथ विभागातर्फे बैठकीत सांगण्यात आले.

रस्त्याच्या कामाला वेग?
शिवणे-खराडी रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, म्हणून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली. त्यात संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करून दररोज या रस्त्याच्या प्रगतीचा आढावा द्यावा, असे सांगितले होते. पाठोपाठ आता महापौरांनीही बैठक घेतल्यामुळे या रस्त्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: pune news five officer for shivane-kharadi road