"एफटीआयआय'चा नावलौकिक वाढवू - अनुपम खेर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - ""आपल्या घरात व प्रत्येक संस्थेतही वेगवेगळ्या अडचणी असतात. त्यावर आपण उपायही काढतो. त्याप्रमाणे "एफटीआयआय'मधील विद्यार्थ्यांशी चर्चा करून संस्थेतील प्रत्येक प्रश्‍नावर एकत्रितरीत्या उत्तरे शोधू आणि संस्थेचा नावलौकिक वाढवू,'' असे "एफटीआयआय'चे नवनियुक्त अध्यक्ष व अभिनेते अनुपम खेर यांनी सोमवारी सांगितले. एकत्र येण्याची सुरवात करत खेर यांनी संस्थेतील खाणावळीत जाऊन विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारत  जेवणही घेतले. 

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संस्थेतील काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला होता; तर काहींनी नाराजी. काही विद्यार्थ्यांनी तर चक्क पत्राद्वारे संस्थेतील अडचणीही खेर यांना सांगितल्या. त्यामुळे खेर यांची निवडही चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर आज अचानक खेर यांनी संस्थेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. 

खेर म्हणाले, ""एफटीआयआय'मध्ये 40 वर्षांपूर्वी मी विद्यार्थी म्हणून आलो होतो. मला त्या वेळसारखेच आजही संस्थेत विद्यार्थी म्हणूनच यायचे होते. त्यामुळे कुणालाही न सांगता संस्थेत थेट आलो. विद्यार्थ्यांशी बोललो. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. मला माझी अध्यक्षपदाची कारकीर्द कसल्याही नकारात्मक गोष्टींनी सुरू करायची नाही. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्‍न सोडविण्यावर आणि संस्थेचा नावलौकिक वाढविण्यावर माझा भर राहील; पण संस्थेत पुन्हा आल्याचा आनंदही तितकाच आहे.'' 

विद्यार्थी म्हणताहेत, "वेट अँड वॉच' 
अभिनेते अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असला तरी विद्यार्थ्यांची भूमिका अजूनही "वेट अँड वॉच' अशीच आहे. खेर आले म्हणजे आता सगळे सुरळीत चालेल, असे लगेच म्हणता येणार नाही. आम्ही प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराज आहोत. आमचा निषेध सुरूच राहील. खेर यांच्यामुळे कारभारात काही बदल होतो का, याकडे आमचे लक्ष असणार आहे, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी नोंदवल्या. 

चर्चा "लंच डिप्लोमसी'ची 
संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून चालत संस्थेत जाणे, स्वतः विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्यांना भेटणे, त्यांच्याशी आपुलकीने चर्चा करणे, त्यांच्या खाणावळीत जाऊन हातात ताट घेत जेवणासाठी रांगेत उभे राहणे, विद्यार्थ्यांच्या टेबलावर बसून एकत्र जेवण करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांशीही मोकळा संवाद साधणे... या अर्धा-पाऊण तास घडलेल्या घटनांमुळे संस्थेतील वातावरण अचानक बदलले; पण खेर गेल्यानंतर या घटनेकडे "लंच डिप्लोमसी' म्हणून पाहिले जात आहे.

Web Title: pune news FTII anupam kher