टाकावू प्लॅस्टिकपासून इंधन, हॅंडबॅग्ज अन्‌ चपलाही

टाकावू प्लॅस्टिकपासून इंधन, हॅंडबॅग्ज अन्‌ चपलाही

पुणे - निसर्ग अनादी काळापासून मानवाचा मित्र राहिला; परंतु आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे हा मित्र आपण गमावण्याच्या मार्गावर आहोत. ज्या अनेक कारणांमुळे आपण निसर्गाचा ऱ्हास करतो आहोत, त्यापैकी एक आहे प्लॅस्टिकचा अतिवापर. या अतिवापराचे दुष्परिणाम गेल्या दोन दिवसांत "सकाळ'ने मांडले. उगवत्या पिढ्यांचे भविष्य प्रदूषणापासून सुरक्षित करू पाहणाऱ्या काही प्रयोगांची दखल आजच्या अंकात.

रुद्रा एन्व्हॉयर्न्मेंटल फाउंडेशन, पुणे
कचऱ्यातील प्लॅस्टिकपासून इंधन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान आणि यंत्र पुण्यातील "रुद्रा एन्व्हॉयर्न्मेंटल फाउंडेशन' यांनी तयार केले आहे. पुण्यातले दोन उद्योजक डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे यांनी ही किमया साधली. इंधनाबरोबरच ज्वलनशील गॅस, रस्ते-बांधणीत वापरण्याजोगा कच्चा माल आणि सोलर-पॅनेल बसवलेली मंगलोरी कौले अशी इतर उत्पादनेही त्यांनी तयार केली. जनरेटर, डिझेल बर्नर, केरोसिनचे स्टो, फर्नेस इन्सिनरेटर यांमध्ये देखील वापरता येईल, असे "पॉली इंधन' (प्लॅस्टिकपासून बनविलेले इंधन) त्यांनी तयार केले. भारतात आणि परदेशांतही त्यांच्या या तंत्रज्ञानाची आणि यंत्राची दखल घेतली जात आहे.

फडतरे म्हणाले, "पॉली इंधन' तयार करणारे मशिन बनविण्यामागे आधीपासून काही नियोजन होते असे नाही, तर कच्च्या तेलापासून जसे प्लॅस्टिक तयार होते, तसेच प्लॅस्टिकपासून पुन्हा कच्चा माल कसा तयार होईल, असा साधा विचार आम्ही केला. पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये प्लॅस्टिक पुनर्निर्मितीचा हा प्रयोग सुरू केला. गावांमध्ये चूल पेटवण्यासाठी सगळ्यात जास्त केरोसिनचा वापर करून लाकूड किंवा प्लॅस्टिक जाळण्यात येते. झाडे तोडल्यामुळे आणि प्लॅस्टिक अविघटितच राहत असल्यामुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. ज्या गावांमध्ये आम्ही "पॉली इंधन' निर्मितीचा प्रयोग सुरू केला आहे, त्या गावांमध्ये केरोसिनऐवजी हे नवे इंधन वापरण्यास सांगतो. प्रतिलिटर 30 ते 40 रुपये इतक्‍या स्वस्त दरात आम्ही ते उपलब्ध करून दिले. परिणामी, त्याचा वापर परवडतो. "पॉली इंधन' हे पर्यायी इंधन आहे. यातून होणारे प्रदूषण डिझेल, पेट्रोलपेक्षा कित्येक पटीने कमी आहे.

"पॉली इंधन' बनवताना लक्षात आले, की प्लॅस्टिकचे दरवेळी पाच ते सात टक्के अवशेष शिल्लक राहतात. हे अवशेष वापरायचे कुठे, असा प्रश्न होता. प्लॅस्टिकचे अवशेष पुणे महापालिकेच्या रस्त्यांमध्ये वापरले गेले. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूमिश्रित प्लॅस्टिकचा पुनर्वापर करून "मंगलोरी कौले' बनविण्याची कल्पना सुचली. संस्थेकडून घराघरांत दोन ते अडीच किलो प्लॅस्टिक मावेल अशा पिशव्या दिल्या जातात. घरातील प्लॅस्टिक कचरा बाहेर न फेकता या पिशव्यांमध्ये भरण्याचे लोकांना आवाहन केले जाते. दर पंधरा दिवसांनी संस्थेची गाडी येऊन त्या पिशव्या जमा करते. याविषयी शिरीष यांनी सांगितले, की जिथे कचरा निर्माण होतो, तिथेच जर त्याचे विभाजन झाले, तर कचऱ्याची विल्हेवाट आणि आमच्यासारख्यांना त्याचा पुनर्वापर करणे सोपे पडेल. लोकांना मुळात कचरा विभाजनाचे महत्त्व पटणे फार महत्त्वाचे आहे.

शुद्धी फाउंडेशन, दिल्ली
दिल्ली येथील "शुद्धी फाउंडेशन' प्रदूषण नियंत्रण व प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर या विषयावर कार्यरत आहे. त्यासाठी फाउंडेशनने मोबाईल ऍप आणि संकेतस्थळ बनविले आहे, ज्यावर विनंती पर्याय (रिक्वेस्ट ऑप्शन) दिला आहे. आपापल्या घरातील प्लॅस्टिक कचरा बाहेर फेकून न देता तो जमा करावा व जमा झालेल्या कचऱ्याची संकेतस्थळवर घरच्या पत्त्यासह रिक्वेस्ट पाठवावी, असे आवाहन "शुद्धी फाउंडेशन'तर्फे दिल्लीवासीयांना केले जात आहे. जास्त तसदी न घेता प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात लोकांनाही सहभागी करून घेता यावे यासाठी हा उपक्रम ही संस्था राबवत आहे.

रिक्वेस्ट पाठविलेल्या घरच्या पत्त्यावर संस्थेकडून टेम्पो पाठविला जातो. या टेम्पोत प्लॅस्टिक कचरा जमा केला जातो. हा कचरा प्लॅस्टिकचा पुनर्वापर करणाऱ्या काही खासगी कंपन्यांना पाठविला जातो. संस्था सध्या "स्वच्छ भारत' अभियानाबरोबरच "हिंदुस्थान पेट्रोलियम'सारख्या खासगी कंपन्यांशी देखील जोडली गेली आहे.

याविषयी फाउंडेशनचे संस्थापक आणि "सीईओ' सौरभ गुप्ता यांनी सांगितले, की खासगी कंपन्यांना पाठविलेल्या प्लॅस्टिकच्या कचऱ्याची गुणवत्ता व विविधता यावरून वर्गवारी केली जाते. पुढे आपापल्या गरजेनुसार त्या-त्या कंपन्या प्लॅस्टिकचे पुनश्‍चक्रीकरण करतात. रेव्हेन्यू स्टोर नावाची संकल्पनाही संस्थेने पुढे आणली आहे. प्लॅस्टिक पुनर्वापरासाठी दिलेल्या कंपन्यांकडून जे पैसे आम्हाला मिळतात, त्यापैकी काही भाग आम्ही ज्या लोकांच्या घरातून प्लॅस्टिक कचरा घेतो त्यांना देतो. किलोप्रमाणे हा हिशेब केला जातो. सध्या ही संस्था दिल्ली, बंगळूर व मुंबईत कार्यरत आहे. "ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर संस्था काम करते हे उल्लेखनीय.

कॉन्झर्व्ह फाउंडेशन, दिल्ली
दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर सध्या सगळीकडे चर्चा आहे. कॉन्झर्व्ह फाउंडेशन प्रदूषणापासून दिल्लीकरांच्या सुटकेसाठी काम करते. कचऱ्यातील प्लॅस्टिकचा कचरा अविघटनशील असल्याने त्याची कशी विल्हेवाट लावता येईल, यावर संस्थेकडून प्रयत्न केले जात आहेत. भंगार विकणाऱ्यांकडून प्लॅस्टिकचा कचरा ही संस्था जमा करते आणि या प्लॅस्टिकच्या पुनर्वापरातून हॅंडबॅग्ज, चपला, शोकेसमध्ये ठेवायच्या वस्तू बनविल्या जातात. या वस्तूंसाठी "लिफाफा डॉट कॉम' हा ब्रॅंड देखील संस्थेने निर्माण केला आहे. या वस्तूंची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे.

संस्थेच्या संचालिका अनिता अहुजा यांनी सांगितले, की जवळपास तीनशे कामगार संस्थेत काम करतात. हे काम अजून मोठ्या स्तरावर करता यावे व ग्रामीण भागातही प्लॅस्टिक कचऱ्याविषयी जागरूकता निर्माण करता यावी यासाठी संस्थेचे निती आयोगाशी बोलणे सुरू आहे. "स्वच्छ भारत' या भारत सरकारच्या अभियानाशी ही संस्था जोडली गेली आहे. विशेषतः सरकारने गंभीरपणे प्लॅस्टिक कचऱ्याचे नियोजन या विषयाचा विचार करावा व प्रत्येक जिल्ह्यात रिसायकलिंग सेंटर असावे. प्लॅस्टिक कचऱ्यापासून विविध वस्तू बनविण्यासाठी विदेशांतील काही डिझायनर देखील या संस्थेशी जोडले गेले आहेत.

प्लॅस्टिक प्रदुषणापासून निसर्ग आणि स्वतःला वाचवायचे असेल तर आपणच प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही. कारण या प्रदुषणाला आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत. प्लॅस्टिक कचऱ्याचे नैसर्गिकरित्या विघटन होण्यास 400 ते 450 वर्ष लागतात. याचा विचार केला तर आपण आपल्या पुढच्या चार पिढ्यांना स्वच्छ ऑक्सिजन देऊ शकणार नाही. तेव्हा वैयक्तिक पातळीवर होऊ शकेल आणि अशा स्वयंसेवी संस्थांची मदत घेउन होऊ शकेल तितका प्लॅस्टिकचा पुर्नवापर एवढा प्रयत्न तर आपण नक्कीच करु शकतो. तुमच्याकडे जर प्लॅस्टिक पुर्नवापर वा प्लॅस्टिक विघटन यासंदर्भात काही कल्पना असतील तुम्ही नक्की त्या 'सकाळ'पर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या अभिनव कल्पना तुम्ही  webeditor@esakal.com या मेल आयडीवर पाठवू शकता. फक्त आपल्या कल्पना आपले संपूर्ण नाव, पत्त्यासह पाठवा आणि subject मध्ये Plastic-free City असे लिहायला विसरू नका. प्लॅस्टिक प्रदुषण मुक्त निसर्ग या अभियानात सहभागी होण्यासाठी तुमच्या कल्पनांना दिशा देण्याचा प्रयत्न 'सकाळ'च्या माध्यमातून केला जाईल हे नक्की.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com