पुण्यात पुन्हा वाहत आहेत परिवर्तनाचे वारे!

सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पुणे - ऐतिहासिक परिवर्तनाचा शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेल्या पुणे शहराने गणेशोत्सव परंपरेतील अनेक बदल पाहिले आहेत. या परंपरेने ठराविक वर्षांनी नवे आणि चांगले ते स्वीकारत आम्ही सदैव बदलांशी हस्तांदोलन करण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहे. सुमारे सव्वाशे वर्षांची मोठी परंपरा लाभलेला हा लोकोत्सव आता पुन्हा परिवर्तनाशी मैत्री करू पाहत आहे. त्यातून आगामी काळातील उत्सवाची उजळलेली दिशा दिसत आहे.

पुणे - ऐतिहासिक परिवर्तनाचा शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेल्या पुणे शहराने गणेशोत्सव परंपरेतील अनेक बदल पाहिले आहेत. या परंपरेने ठराविक वर्षांनी नवे आणि चांगले ते स्वीकारत आम्ही सदैव बदलांशी हस्तांदोलन करण्यास सज्ज असल्याचे सांगितले आहे. सुमारे सव्वाशे वर्षांची मोठी परंपरा लाभलेला हा लोकोत्सव आता पुन्हा परिवर्तनाशी मैत्री करू पाहत आहे. त्यातून आगामी काळातील उत्सवाची उजळलेली दिशा दिसत आहे.

गणेशोत्सव समीप आलेला असताना शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी ‘सकाळ’ने नुकतेच एका बैठकीद्वारे हितगूज करण्याचा प्रयत्न केला. समस्त गणेश मंडळांना निमंत्रित करण्यात आले होते. सुमारे सव्वाशेवर पदाधिकारी-प्रतिनिधींनी बैठकीत सक्रिय सहभाग घेतला. सव्वाशे वर्षे आणि शतकोत्तर परंपरा असलेल्या मंडळांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही मंडळे शतकोत्तर रौप्यमहोत्सव मोठ्या धूमधडाक्‍यात साजरा करत आहेत. त्याला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन मोठी जबाबदारीही उचलत आहेत. या औचित्याने मंडळांनी यंदा काय संकल्प केले आहेत, वर्षभर ते काय करू इच्छितात आणि सर्वांनी एकत्र येऊन कोणते संयुक्त उपक्रम राबवता येतील हे जाणून घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. ‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे हा संवाद घडवून आणत आहे. त्यातून अनेक चांगल्या बाबी समोर येत आहेत.

यंदाच्या बैठकीतही मंडळांसमोर असलेल्या अनेक अडचणींसोबतच सामाजिक जाणिवेतून नवे काय करता येईल आणि पर्यावरणपूरक कोणते उपक्रम राबवता येईल? यावरही प्रदीर्घ चर्चा झाली. पदाधिकाऱ्यांकडून येत असलेल्या सूचना खूपच महत्त्वाच्या आणि सर्वांच्या जिव्हाळ्याच्या होत्या. पुण्यातील पर्यावरणाची काळजी केवळ पर्यावरणप्रेमींनाच नव्हे, तर सर्व गणेश मंडळांनाही आहे, हे पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. नदीप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण अशा सर्व विषयांवर ते तळमळीने बोलताना दिसले. शेवटी एकमताने काही संकल्प करण्यात आले. जे पुण्याच्या ऐतिहासिक लोकोत्सवाला नवी दिशा देणारे ठरू शकतील.

‘पीओपी’ लवकर पाण्यात विरघळत नसल्याने मूर्ती अनेक दिवस पाण्यात तशाच राहतात, त्यामुळे जलप्रदूषण होते; शिवाय एकप्रकारे मूर्तींची विटंबनाच होते. त्यावर पर्याय म्हणून पुण्यातील सर्व साडेचार ते पाच हजार सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढील वर्षापासून ‘पीओपी’ऐवजी शाडूमातीच्या मूर्ती बनवाव्यात, असे आवाहन या वेळी एका सुरात केले. परिवर्तनासाठी सज्ज असलेल्या गणेशोत्सवाच्या परंपरेतील ही खूप दूरगामी परिणाम करणारी घटना ठरू शकेल. कारण, सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे, त्यांच्या देखाव्यांचे घरोघरी केवळ आकर्षणच असते असे नाही, तर बऱ्याच प्रमाणात अनुकरणही होत असते. म्हणजे, पुण्याची ‘पीओपी’ गणेशमूर्तींची प्रथा पुन्हा शाडूमातीच्या मूर्तीच्या दिशेने चालेल, असे भाकीत वर्तवण्यास हरकत नसावी. येत्या काही वर्षांत तसे झाले, तर गणेशोत्सवात क्रांतिकारी परिवर्तन होईल. पुण्यात जे घडते ते अवघ्या महाराष्ट्रभर अनुकरणीय ठरते, असे म्हणतात. म्हणजे राज्यातील नव्या बदलाची नांदी पुण्यातील गणेश मंडळांचा हा निर्णय होऊ शकेल.

सरदार खासगीवाले, भाऊसाहेब रंगारी, लोकमान्य टिळक, गणपतराव घोटवडेकर अशा धुरिणांनी गणेशोत्सवाचे महत्त्व ओळखले होते. भाऊसाहेब रंगारी यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असणाऱ्यांना सर्वतोपरी कुमक पुरवली. लोकमान्यांनी या उत्सवाचे महालोकचळवळीत रूपांतर केले. त्यामुळे गणेशोत्सव आणि स्वातंत्र्यलढा हे समीकरण इतिहासाच्या पानांमध्ये कायमचे कोरले गेले. प्लेगची महामारी, स्वातंत्र्यलढ्यातील तणावपूर्ण स्थिती, पानशेतचा महाप्रलय अशी अनेक संकटे झेलत उत्सव आगेकूच करत आहे. म्हणून उत्सव अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार ठरतो. तो आता नव्या बदलाचा वाहक ठरून इतरांनाही दिशादर्शक ठरणार आहे. 

सभोवारच्या उजाड टेकड्या हेरून त्या हिरव्यागार करण्याचा संकल्प सोडताना मंडळांनी सव्वा लाख झाडे लावण्याचे ठरवले आहे. यंदा बाप्पांना निरोप देताच मंडळे पुन्हा एकत्र येऊन अंमलबजावणीचा आराखडा निश्‍चित करणार आहेत. गजानन हे विद्येचे दैवत, तर पुणे विद्येचे माहेरघर... येथे रात्रशाळांमध्ये शेकडो विद्यार्थी शिकतात. या सर्वांची शिक्षणाची जबाबदारी सामूहिकपणे घेण्याचा संकल्पही गणेश मंडळांनी सोडला आहे. सव्वाशे वर्षांच्या वळणावर या घडामोडी आधीच देदीप्यमान असलेल्या या उत्सवाचे नवे तेजाळलेले आणि नावीन्याची कास धरणारे, लोकहिताचे ते सर्व स्वीकारणारे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या आहेत. सार्वजनिक स्वच्छता, स्वयंशिस्त, अनावश्‍यक खर्चाला फाटा अशा बाबी अधिक काटेकोरपणे पाहिल्या जात आहेत. अशा या मंडळांचे सर्व पुणेकरांनी जोरदार अभिनंदन करायला हवे.

गणेश मंडळांची सल
सार्वजनिक गणेश मंडळे नव्या लोकहितकारी प्रथा निर्माण करण्याचे प्रयत्न करत असतानाच, त्यांना सलणारे काही मुद्देदेखील आहेत. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची आम्हा मंडळांकडे पाहण्याची दृष्टी पूर्वग्रहदूषित आहे, आम्हाला ते नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे करतात, असे प्रश्‍न त्यांच्या मनात काही घटनांमुळे निर्माण झाले आहेत. मंडळांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दलही त्यांचा आक्षेप आहे. रात्री उशिरापर्यंत ध्वनिवर्धक सुरू ठेवण्याच्या तारखांचा घोळ नेहमीच असतो. तो यंदाही आहे. हा निर्णय एकतर्फी न होता मंडळांशी चर्चा करून खूप आधी घ्यावा. या मंडळांकडे प्रचंड ऊर्जा आहे. ती पुण्यालाच नव्हे, तर जगाला ‘सांस्कृतिक प्रकाश’ देऊ शकते. तिचा वापर कसा करायचा यावर प्रशासन, पोलिसांनी विचार करावा. काही थोडक्‍या लोकांमुळे उत्सवाला गालबोट लागू नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारीही मंडळांवर आहे. विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कसा कमी करता येईल, याचा सर्वांनी एकत्र बसून विचार करावा.

Web Title: pune news Ganesh Festival ganeshotsav