विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविल्या पर्यावरणपूरक ४५० गणेशमूर्ती !

हरिभाऊ दिघे 
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

‘पर्यावरणाचा संदेश, मातीतून घडवू गणेश‘ ; स्वतः घडविलेल्या गणेशमूर्ती पाहून मुलांचे चेहरे आनंदले 

तळेगाव दिघे (जि. नगर) संगमनेर येथील गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मातीतून घडवू गणेश’ कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. स्वतः घडविलेली गणेशमूर्ती पाहताना मुलांचे चेहरे आनंदाने फुलले. या कार्यशाळेत संगमनेरमधील साडेचारशे विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविल्या व आपापल्या घरी नेऊन गणेशोत्सवात त्यांची स्थापना करण्याचा संकल्प सोडला. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनीही कार्यशाळेत सहकुटुंब सहभाग घेतला.

 सुप्रसिध्द मूर्तीकार नवनाथ वाकचौरे ( पुणे ) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मालपाणी लॉन्स येथे झालेल्या या कार्यशाळेत उत्साही विद्यार्थ्यांची अक्षरशः झुंबड उडाली. अखेर साडेचारशे मुलांनाच प्रवेश देणे शक्य झाले. गीता परिवारचे राष्ट्रीय सहसचिव गिरीश डागा आणि बालभवनचे स्वप्नील गायकवाड यांनी उपस्थितांना मूर्ती घडविण्याबाबत सूचना दिल्या. प्लास्टर ऑफ परीसच्या मूर्ती विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. त्या मूर्तींच्या रासायनिक रंगांमुळे पाण्यात विषारी द्रव्ये मिसळली जातात. म्हणून जलप्रदूषण रोखण्यास गेल्या काही वर्षांपासून बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांच्या कल्पकतेतून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. ‘पर्यावरणाचा संदेश, मातीतून घडवू गणेश‘ या घोषणेसह दरवर्षी होणाऱ्या या कार्यशाळेस मिळणारा प्रतिसाद सातत्याने वाढत चालला आहे. आज संपन्न झालेल्या कार्यशाळेत ध्रुव अॅकेडमीचे सर्वाधिक १११ विद्यार्थी सहभागी झाले होते.

गणेश विसर्जनाच्या दिवशी या मूर्तींचे विसर्जन घरातील फुलझाडांच्या रिकाम्या कुंडीत करावे आणि त्या मातीत बीजारोपण करावे म्हणजे त्यातून रोप उगवेल. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि वृक्षारोपण दोन्हीही साध्य होईल अशी बालभवनच्या वतीने मांडण्यात आलेली कल्पना उपस्थित विद्यार्थ्यांना मनापासून आवडल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी कार्यशाळेस भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. काही परिवारातील पती पत्नी आणि मुले असे सर्वजण उत्साहाने यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पाच वर्षांच्या नातीसह ७५ वर्षांच्या आजींनीही उत्साहाने सहभागी होऊन गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. 

Web Title: pune news ganesh idols made by students