ऊर्जेचे दर्शन घडवून आणणारे तालचक्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

पुणे - ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा एका सुरात घोषणा सुरू होत्या... शंख फुकला जात होता... तेवढ्यात वादकांवर प्रकाशझोत येऊन थांबले... ताशा कडकडाडू लागला, ढोलांचा आवाज घुमू लागला, ध्वज उंच फडकू लागले तसतसे एका ठिकाणी थांबलेले प्रकाशझोत थिरकू लागले आणि उपस्थितांची पावलेसुद्धा. मग पुढचे पाच तास उत्कंठा वाढवणाऱ्या आणि तरुणाईतील ऊर्जेचे दर्शन घडवून आणणाऱ्या वादनाने गुरुवारची सायंकाळ अविस्मरणीय बनवली.

पुणे - ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’ अशा एका सुरात घोषणा सुरू होत्या... शंख फुकला जात होता... तेवढ्यात वादकांवर प्रकाशझोत येऊन थांबले... ताशा कडकडाडू लागला, ढोलांचा आवाज घुमू लागला, ध्वज उंच फडकू लागले तसतसे एका ठिकाणी थांबलेले प्रकाशझोत थिरकू लागले आणि उपस्थितांची पावलेसुद्धा. मग पुढचे पाच तास उत्कंठा वाढवणाऱ्या आणि तरुणाईतील ऊर्जेचे दर्शन घडवून आणणाऱ्या वादनाने गुरुवारची सायंकाळ अविस्मरणीय बनवली.

गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून ‘सकाळ माध्यम समूह’ने ढोल-ताशा महासंघाच्या सहकार्याने ढोल-ताशा स्पर्धा आयोजित केली होती. रांका ज्वेलर्स प्रस्तुत सकाळ ढोल-ताशा स्पर्धा पॉवर्ड बाय ‘टायझर’ यांच्या अंतिम फेरीत शहरी वादनाच्या गटात सहा, तर ग्रामीण ढंगाच्या वादनाच्या गटात चार पथक सहभागी झाले होते. त्यांच्या रंगतदार वादनाने स्पर्धेबाबतची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे या स्पर्धेचे सहयोगी प्रायोजक होते.

अंतिम फेरीत शहरी वादन विभागात शिवप्रताप वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, अभिनव स्वरगर्जना ढोल-ताशा पथक, शिवाज्ञा ढोल-ताशा पथक, ऐतिहासिक वाद्य पथक, श्री सुधर्म ढोल-ताशा पथक; तर ग्रामीण वादन विभागात हनुमान तरुण मंडळ, ओम साई ग्रुप, शंभुराजे प्रतिष्ठान, जयनाथ ढोल-ताशा पथक यांनी वादन सादर केले. कोणाच्या वादनात परंपरा आणि नवतेचा मिलाफ तर कोणाच्या वादनात दशावताराचे दर्शन... कोणाचे मावळ्यांच्या वेशभूषेत ऐतिहासिक वादन तर कोणाचे नावीन्यपूर्ण रंगभूषेची जोड देऊन केलेले वादन... याच्यासोबतीलाच सभागृहात उपस्थित तरुणांचा जल्लोष या वातावरणामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगत गेली.

तालवाद्य वादक नीलेश परब यांच्याबरोबरच गिरीश सरदेशपांडे, महेश मोळवदे, राजेंद्र घाणेकर, साहेबराव जाधव यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या वेळी ‘रांका ज्वेलर्स’चे संचालक फत्तेचंद रांका, ओमप्रकाश रांका, डॉ. रमेश रांका, तेजपाल रांका, शैलेश रांका, ‘टायझर’चे संचालक कुणाल मराठे, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’चे संचालक किरण ठाकूर, विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, ‘सकाळ’चे संचालक भाऊसाहेब पाटील, वरिष्ठ सरव्यवस्थापक शैलेश पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. दरम्यान, अभिनेता सुयश टिळक आणि परब यांनीही वादन सादर करून स्पर्धेत रंग भरले. रवींद्र खरे यांनी  सूत्रसंचालन केले.

विजेते संघ (शहर विभाग)
प्रथम     :  अभिनव स्वरगर्जना, पनवेल (एक लाख रुपये)
द्वितीय     :  शिवसाम्राज्य पथक (७५ हजार रुपये)
तृतीय     :  ऐतिहासिक वाद्य पथक (५० हजार रुपये)

ग्रामीण विभाग
प्रथम     : हनुमान तरुण मंडळ, पवळे आळी, पिरंगुट (१ लाख रुपये)
द्वितीय     : जयनाथ मंडळ (७५ हजार रुपये)
तृतीय     : ओम साई मंडळ (५० हजार रुपये)

नोकरी, व्यवसाय सांभाळून ढोल-ताशा वादक पथकात सहभागी होतात. हौस म्हणून, छंद म्हणून ते वादन करतात; पण ‘सकाळ’ने त्यांच्यासाठी स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील कलागुण विकसित करण्याचे काम केले आहे. त्यामुळेच तर ढोल-ताशा वाजविताना ताल, त्याचा मात्रा याचा अभ्यास होताना दिसत आहे. त्यामुळे हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
- नीलेश परब, परीक्षक, तालवादक

ध्वनिवर्धकाच्या भिंती, त्यामुळे होणारा दणदणाट असे चित्र सध्याच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे. त्यापेक्षा ढोल-ताशा वादनाचे प्रमाण वाढले तर आजचे गणेशोत्सवाचे चित्र बदलेल. अशा स्पर्धेतून वादनाविषयीचा कल तर वाढतोच; शिवाय वादकांना निश्‍चितच नवे बळ मिळते, प्रेरणा मिळते.
- सुयश टिळक, युवा अभिनेता

महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा पुढे आणण्याचे आणि त्यासाठी तरुणांना जागृत करण्याचे काम ‘सकाळ’या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहे. ग्रामीण भागातील कलेलाही नवे व्यासपीठ मिळत आहे. हे काम प्रशंसनीय असेच आहे.
- फत्तेचंद रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

ढोल-ताशा ही आपली परंपरा आहे. महाराष्ट्राची शान आहे. ती कायम राहिली पाहिजे. आपली संस्कृती जपण्याचे काम यातून होते. त्यामुळे ‘सकाळ’ने घेतलेल्या या स्पर्धेला वेगळे महत्त्व आहे. ढोल-ताशा वादनाचा प्रसार झाला पाहिजे.
- ओमप्रकाश रांका, संचालक, रांका ज्वेलर्स

ढोल-ताशा वादन ऐकताना आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेचे दर्शन होते. ती ऊर्जा आपल्यातही संचारते. ऊर्जा वाढविणारे हे माध्यम आहे. त्यामुळे ढोल-ताशा पथकांना मान-सन्मान मिळत आहे आणि तो मिळालाच पाहिजे.
- तेजपाल रांका, रांका ज्वेलर्स

ढोल-ताशा पथकात नवी पिढी सहभागी होत आहे. हे प्रमाण आणखी वाढले पाहिजे. या कलेचा प्रसार व्हायला हवा. या दृष्टिकोनातून ‘सकाळ’ने घेतलेली ही स्पर्धा खास आहे. परंपरा जपण्याचे काम यातून होत आहे.
- शैलेश रांका, रांका ज्वेलर्स

भारतीय सेना देशाचे संरक्षण करते. तसे संस्कृतीचे रक्षण वेगवेगळे घटक करतात. त्यापैकी एक म्हणून ढोल-ताशा वादकांकडे पाहिले पाहिजे. खरोखरच संस्कृती सेना या भूमिकेतून मी त्यांच्याकडे पाहतो. व्यवसाय-नोकरीत सुटी घेऊन ते वादनात सहभागी होऊन संस्कृती पुढे नेत असतात. हे काम सॅल्यूट करण्यासारखेच आहे.
- कुणाल मराठे, संचालक, टायझर

ढोल-ताशा स्पर्धा हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. कारण अशा व्यासपीठामुळे लोकनृत्य, लोकसंगीत, पारंपरिक वादन अशा विविध कलांना वाव मिळतो. नवे बळ मिळते. शिवाय, संस्कृतीचे दर्शनही होते.
- किरण ठाकूर, संचालक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

Web Title: pune news ganeshotsav dhol tasha