पुण्याच्या समस्या सोडविण्यावर भर देऊ

पुण्याच्या समस्या सोडविण्यावर भर देऊ

पुणे - गणेशोत्सवाला सव्वाशे वर्षे होत आली आहेत. या गणेशोत्सवाने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. समाजप्रबोधनासाठी व्याख्याने झाली, मेळे भरविले. मात्र प्रत्येक दशकांप्रमाणे उत्सवातही बदल होत आले. आजच्या स्थितीत वाहतूक समस्या, ध्वनिप्रदूषण यासारख्या विषयांवर मंडळांनी समाजप्रबोधन करण्याची वेळ आली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सकारात्मक ताकद दाखवून दिल्यास पुण्याचे ध्वनिप्रदूषण, वाहतूक समस्या सोडविण्यासही मदत होईल. हा विचारही ‘सकाळ’ कार्यालयात झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत प्रामुख्याने चर्चेत आला.

‘‘बदल घडवायचा असेल, तर गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडील सकारात्मक ताकद दाखविली पाहिजे. शहरात वाहतुकीची समस्या प्रमुख आहे. गणेशोत्सवात मंडपांमुळे ते जाणवते. म्हणूनच आम्ही यंदा हत्ती गणपती चौक वाहतुकीसाठी खुला राहील, अशाच पद्धतीने मंडप उभारला आहे. श्रींची आसन व्यवस्था उंचावर घेतली आहे. त्यामुळे खालच्या बाजूने वाहनांना ये-जा करता येऊ शकते. ही आजच्या काळाजी गरज आहे. ध्वनी प्रदूषणाबाबत ३६५ दिवस बोलले जाते; परंतु सर्वाधिक ध्वनी प्रदूषण तरुणांकडून होते. यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी आणि ध्वनिप्रदूषण कमीत कमी व्हावे. यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या संघटनशक्तीतून समाजासाठी एक चांगला ठसा उमटून दाखवावा.’’  
- श्‍याम मानकर,  अध्यक्ष, अखिल नवी पेठ हत्ती गणपती मंडळ

‘‘गणेशोत्सवात मंडप उभारण्यावरून मंडळांना नेहमीच विचारणा होते. मात्र मंडपांच्या आजूबाजूला अनेक पथारीवाले, छोटे व्यावसायिक अतिक्रमण करतात. उत्सवकाळात तरी अशा प्रकारे अतिक्रमण होऊ नये. यासाठी उपाययोजना व्हावी. त्यामुळे नागरिकांनाही देखावे पाहण्याचा आनंद घेता येईल. त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेचाही पाठपुरावा प्रत्येकानेच करावा. त्यामुळे शहराच्या विकासातही भर पडेल. ‘सकाळ’च्या माध्यमातून समाज उपयोगी कार्याला मंडळाचे सहकार्य राहील.’’ 
- बाळासाहेब मारणे, अध्यक्ष, हुतात्मा बाबूगेनू मंडळ

‘‘गणेशोत्सवाचे यंदा १२५ वे वर्ष आहे. सव्वाशे वर्षांचा हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचावा. यासाठी गणेशोत्सव सदन उभे राहावे. त्यातून गणेशोत्सवाच्या ऐतिहासिक घटना वाचायला व चित्र स्वरूपात पाहायला मिळतील. वृक्षसंवर्धनाच्या दृष्टिकोनातूनही आमचे मंडळ कार्यरत आहे. आत्तापर्यंत १९२ घरांच्या दर्शनी भागात आजी-आजोबांच्या नावे कुंड्यांमध्ये आम्ही झाडे लावली आहेत. रोटरीच्या माध्यमातून या वर्षात पन्नास सोसायट्यांच्या गच्चीवर (टेरेस) झाडे लावण्याचा आमचा संकल्प आहे. नगरसेवकांनी देखील त्यांच्या प्रभागात, वॉर्डातील सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबवायला सुरवात केल्यास अनेकांना त्याचा लाभ घेता येईल. मुख्यत्वे करून पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी नगरसेवकांकडूनही हातभार लागेल. ’’ 
- उदय जगताप, आदर्श तरुण मंडळ

‘‘देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आपल्याला आनंदोत्सव साजरा करता येतो. त्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यामुळे यंदा आमच्या मंडळातर्फे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा देखावा सादर करणार आहोत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, भारतीय विज्ञान संस्था या विषयीची माहिती देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. या सैनिकांप्रती मदतनिधी म्हणून गणेश मंडळांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. जमलेला निधी त्या सैनिकांसाठी सरकारकडे सुपूर्द करता येईल आणि समाजाचे ऋणही बाळगल्याचे समाधान मिळेल.’’ 
- समीर रुपदे, सनसिटी रहिवासी संघ उत्सव समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com