गणेशोत्सव खर्चाबाबत विरोधकांकडून दिशाभूल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

पुणे - महापालिकेतर्फे होणाऱ्या गणेशोत्सवात आठ कोटी खर्च होणार, अधिकारी प्रायोजक शोधत आहेत, उत्सवात उधळपट्टी होणार, या निव्वळ वावड्या असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी स्पष्ट केले. विरोधी पक्ष पुणेकरांची दिशाभूल करून गणेशोत्सवाचे राजकारण करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवासाठी महापालिका आठ कोटी रुपये खर्च करणार, अधिकाऱ्यांना प्रायोजक शोधण्याचा आदेश दिला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते चेतन तुपे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, महापौरांनी या वृत्ताचा इन्कार केला आणि विरोधकांचे आरोप म्हणजे वावड्या असल्याचे स्पष्ट केले. गणेशोत्सवासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद असून, त्यानुसारच खर्च करणार आहोत. एखादा कार्यक्रम वाढला तर त्यासाठी प्रायोजक घेऊ, असेही महापौरांनी म्हटले आहे. तसेच, या उत्सवासाठी अनेकांनी स्वेच्छेने प्रायोजकत्व द्यायची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, अधिकाऱ्यांना प्रायोजक शोधण्याचा आदेश दिला आहे, ही देखील विरोधकांची कल्पना आहे. गणेश भवनासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. गणेशोत्सवासाठी यापूर्वी दोन वेळा बैठका झाल्या. त्यात विरोधी पक्षांचे सदस्यही सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेतच उत्सवातील कार्यक्रमांचे नियोजन झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. हा उत्सव भाजपचा नाही, तर संपूर्ण शहराचा आहे. महापालिका समाजातील सर्व घटकांना सामावून घेणार आहे, असे महापौरांनी सांगितले. 

Web Title: pune news ganeshotsav Mukta Tilak