पुण्याच्या कचरा डेपो आता पिंपरी-सांडसला

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 1 जून 2017

पुणे-मुंबई - पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली असून, कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी पिंपरी-सांडस येथील वन विभागाची सुमारे 19.9 हेक्‍टर जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

पुणे-मुंबई - पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली असून, कचराप्रक्रिया प्रकल्पासाठी पिंपरी-सांडस येथील वन विभागाची सुमारे 19.9 हेक्‍टर जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

दरम्यान, या जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया वेगाने करून, त्यावर प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू करण्यात येतील, असे महापालिकेच्या घनकचरा विभागाने बुधवारी (ता. 31) स्पष्ट केले. शहरात रोज एक हजार 650 टन कचरा जमा होतो. त्यापैकी एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित कचरा उरळी देवाची आणि फुरसंगी येथील डेपोत टाकण्यात येतो. परंतु, येथील रहिवाशांच्या विरोधामुळे कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-सांडस येथील वन विभागाची जागा देण्याची मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे 2014 मध्ये केली होती. त्यातच, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या आंदोलनामुळे हा प्रश्‍न अधिकच तीव्र झाला आहे. मात्र, तेथील रहिवाशांच्या विरोधामुळे त्यावर निर्णय झाला नव्हता.

महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर ही जागा ताब्यात घेण्याबाबत महापौर मुक्ता टिळक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. "शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार पिंपरी-सांडस येथील जागा महापालिकेला देण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यावर फडणवीस यांनी शिक्‍कामोर्तब करीत ही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्याचा आदेश दिला. दरम्यान, पिंपरी-सांडस येथील जागेच्या बदल्यात महापालिकेच्या ताब्यतील तुळापूर येथील 19. 9 हेक्‍टर जागा वन खात्याला देण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: pune news garbage depo shift to pimpri-sandas