कचऱ्यापासून द्रवरूप खत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

पुणे - औरंगाबाद ते पुण्या-मुंबईपर्यंत कचऱ्याच्या प्रश्‍नाने उग्र स्वरूप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चैताली पोपट क्षीरसागर या विद्यार्थिनीने व तिच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी केले आहे. ‘जैविक कचऱ्यापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती’ करण्यासाठीचे संशोधन चैतालीने केले असून त्याला राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे.

पुणे - औरंगाबाद ते पुण्या-मुंबईपर्यंत कचऱ्याच्या प्रश्‍नाने उग्र स्वरूप धारण केलेले असताना त्यावरील एक उपाय शोधण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चैताली पोपट क्षीरसागर या विद्यार्थिनीने व तिच्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी केले आहे. ‘जैविक कचऱ्यापासून दर्जेदार अशा द्रवरूप खताची निर्मिती’ करण्यासाठीचे संशोधन चैतालीने केले असून त्याला राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय ‘अन्वेषण’ स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे.

चैताली अहमदनगर जिल्ह्याच्या सोनई येथील आर्टस सायन्स कॉमर्स महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे आणि त्यांच्याकडे संशोधन करणारी विद्यार्थिनी ऐश्‍वर्या मारकड यांनी मार्गदर्शन केले. 

राष्ट्रीय पातळीवरील आंतरविद्यापीठीय संशोधन, नावीन्यपूर्ण व उपयुक्त प्रकल्पांच्या सादरीकरणाची स्पर्धा दरवर्षी होत असते. ती याच आठवड्यात हरियानामधील अंबाला येथील चित्करा विद्यापीठात पार पडली. त्यामध्ये १५ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात चैताली तसेच चहक खजुरिया व शुभान्यू सिंग हे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहभागी झाले होते. त्यात चैतालीने कृषी विषयांतर्गत हे सादरीकरण केले.

ती नेवासे फाटा येथील मुकिंदपूर या गावची आहे. तिचे शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तिचे आई-वडील दोघेही प्राथमिक शिक्षक आहेत. यापूर्वी तिने विज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे, अशी माहिती या स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून मेन्टॉर म्हणून गेलेले डॉ. शशिकांत गुंजाळ यांनी दिली. डॉ. लावरे म्हणाले, ‘‘जैविक कचऱ्यापासून खत करण्याचे काम अनेक जण करतात. मात्र, या प्रक्रियेत कचऱ्याचे तुकडे केले जातात. त्याच्यावर गरम पाण्याची क्रिया केली जाते आणि काही जीवाणूही वापरले जातात. त्यामुळे ही क्रिया वेगाने घडून येते. या प्रक्रियेतील काही घटकांसाठी पेटंट मिळावे यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत.’’

चैताली क्षीरसागरच्या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर द्वितीय पारितोषिक
सहा महिन्यांपासून या विषयावर मी काम करत होते. जैविक कचऱ्यापासून तयार झालेले द्रवरूप खत पिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. ते वापरण्यासाठीही सोयीचे ठरते. तसेच, कचऱ्याची समस्यासुद्धा आपोआप निकाली लागते. लावरे सर आणि ऐश्‍वर्या मारकड यांनी केलेले मार्गदर्शन आणि या प्रकल्पाचे मी करू शकलेले सादरीकरण यामुळे मला हे यश मिळू शकले.
- चैताली क्षीरसागर

संशोधनाची वैशिष्ट्ये
 संशोधनाद्वारे प्रक्रिया व उपकरण विकसित 
 सर्व प्रकारच्या जैविक कचऱ्यासाठी (फळे, भाजीपाला, पालापाचोळा, हाडे, उरलेले अन्न) उपयुक्त 
 द्रवरूप खतात केवळ आठवड्याभरात रूपांतर
 उरलेल्या ३० टक्के पदार्थांचे एकाच दिवसात खतात रूपांतर

Web Title: pune news garbage liquid fertilizer