पाचोळ्याच्या व्यवस्थापनाची मोहीम

नीला शर्मा
शुक्रवार, 2 जून 2017

पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन. यानिमित्ताने पर्यावरण जपण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींविषयी आजपासून खास मालिका देत आहोत.

पाचोळ्याशी अदितीचं असं काही नातं जडलं, की लोकांच्या बेफिकिरीमुळे पाचोळ्याचं सडणं तिला सलू लागलं. पाचोळा जणू तिच्याशी हितगूज करु लागला. मग अदितीनं स्वतःच्या परिसरातला पाचोळा खतात रूपांतरित केला. तेवढ्यावर ती थांबली नाही, तर पाचोळ्याच्या व्यवस्थापनासाठी तिनं मोठी मोहीमच हाती घेतली.

अदिती देवधर ही तरुणी माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नोकरी करत होती. मध्यंतरी तिला वाटलं, की नोकरीसाठी बरेच तास घराबाहेर राहण्यापेक्षा स्वतंत्रपणे घरातून काम करावं. मुलाची नीट काळजी घेत आवडत्या निसर्गात रमावं. तिनं पर्यावरणाबद्दलची जाण वाढविणारा एक अभ्यासक्रमही पूर्ण केला. 

ती म्हणते, ‘‘नोव्हेंबर ते मार्च हा आपल्याकडे वृक्षांच्या पानगळतीचा काळ असतो. बहुसंख्य लोक परिसरातला पाचोळा जाळून टाकतात. त्यानं हवा प्रदूषित तर होतेच, शिवाय रोगराई वाढते. याउलट हा पाचोळा झाडांभोवतालच्या जमिनीवर आच्छादन म्हणून घालणं किंवा खत करण्यासाठी वापरल्यास नैसर्गिक चक्राला हातभार लागेल. यासाठी ज्यांच्याकडे पाचोळा आहे; पण वरील दोन्ही गोष्टी नाहीत, त्यांनी त्यांच्याकडील पाचोळा हवा असणाऱ्यांना देऊन टाकावा.’’

अदितीनं मध्यस्थाची भूमिका स्वीकारून गेल्या सात महिन्यांत सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त पोती पाचोळा हवा त्यांना मिळवून दिला. अलीकडेच सुरू झालेलं हे काम सोशल मीडियाच्या बळावर फोफावलं आहे. सुजाता नाफडेंसारख्या निसर्गप्रेमींमुळे अदितीला प्रचंड हुरूप आला. सुजाताच्या घरालगतच्या रिकाम्या प्लॉटवर संबंधितांच्या परवानगीने तीन कुटुंबांना पुरेल एवढा सर्व प्रकारचा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीनं पिकवला जातो. काही फळझाडे व फुलझाडेही तिथं आनंदानं डोलत आहेत. असे आणखीही लोक संपर्कात आले आहेत.

अदितीनं ‘ब्राउन लीफ’ या नावानं ही मोहीम चालवली आहे. ती म्हणते, ‘‘वाळलेलं एकही पान जाळलं जाऊ नये. ते मातीत मिसळून माती अधिक उत्तम प्रतीची व्हावी. ज्यांना अशा सदुपयोगासाठी पाचोळा हवा आहे, त्यांना दूर जावं लागू नये, यासाठी माहितीची देवाण-घेवाण चांगल्या प्रकारे करता यावी, म्हणून मी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत सॉफ्टवेअर तयार करते आहे.’’

Web Title: pune news garbage management campaign