कचराप्रक्रिया प्रकल्पाचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

येत्या दहा दिवसांत प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री वेळ देणार आहेत.
- मुक्ता टिळक, महापौर

‘एनजीटी’ची परवानगी; रामटेकडी येथे साडेसातशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार

पुणे - राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) परवानगी दिल्यामुळे रामटेकडी येथील ७५० टनांचा कचराप्रक्रिया प्रकल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या आठवड्यात त्याचे भूमिपूजन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. 

रामटेकडीमध्ये हंजर प्रकल्पाशेजारी १० एकर जागेत नियोजित कचराप्रक्रिया प्रकल्प साकारणार आहे. ओल्या आणि सुक्‍या कचऱ्यापासून त्यातून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जपानी तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. ‘बांधा- वापरा- हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार असून, प्रत्येक टनावर होणाऱ्या प्रक्रियेसाठी शुल्कही देणार आहे.

संबंधित कंत्राटदाराने प्रकल्पाची त्याच्या खर्चातून उभारणी करायची आहे. भूमिपूजन झाल्यावर दोन वर्षांत प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज पहिल्या टप्प्यात महापालिकेचे पथदिवे, तसेच अन्य उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रकल्पातून निर्माण होणारी वीज ‘महावितरण’ कंपनीला देता येईल का, याचीही चाचपणी महापालिका करणार आहे, अशी माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख आणि सहआयुक्त सुरेश जगताप यांनी दिली. 

या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सात जुलै रोजी व्हावे, यासाठी महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले प्रयत्नशील आहेत; परंतु मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम अद्याप निश्‍चित झालेला नाही. शहरात सध्या दररोज सुमारे १६०० टन कचरा निर्माण होतो. त्यातील सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रियेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर हा नियोजित प्रकल्प वेगाने कार्यान्वित झाल्यास शहरातील कचऱ्यावरील प्रक्रियेची समस्या सुटू शकते.

Web Title: pune news garbage process project route free