जगण्यालाच कवेत घेणार तंत्रज्ञान!

जगण्यालाच कवेत घेणार तंत्रज्ञान!

पुणे - मावळलेल्या वर्षात आर्थिक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याचे दिसले. या वर्षात म्हणजे २०१८ मध्ये मानवी जगण्याच्या अधिकाधिक बाजूंना तंत्रज्ञान कवेत घेईल, असे चित्र आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने जगणे अधिक समृद्ध आणि अनुभवसंपन्न होईल, अशी संशोधने (इनोव्हेशन्स) या वर्षी अपेक्षित आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि व्हर्च्युअल रिॲलिटी या तीन नव्या तंत्रज्ञानांचा आतापर्यंत मर्यादित प्रमाणावर झालेला वापर सर्वसामान्यांपर्यंत पोचायला या वर्षी सुरवात होत आहे.

इंटरनेट ऑफ थिंग्ज
‘वायरलेस कनेक्‍टिव्हीटी वापरणारी आणि डेटा ट्रान्स्फर करण्याची क्षमता असलेली उपकरणे (डिव्हाइसेस)’ म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्ज. यामधील ‘थिंग्ज’ म्हणजे उपकरण. जगभरात अशी सुमारे २१ अब्ज उपकरणे आहेत.

या वर्षामध्ये अशा उपकरणांची संख्या २३ अब्जांवर जाईल आणि २०२५ पर्यंत अशा उपकरणांची संख्या ७५ अब्जांहून अधिक असेल. ‘स्मार्ट’ उपकरणे म्हणून आज ती वापरात आहेत. या वर्षाच्या अखेरीस येऊ घातलेल्या फाईव्ह जी कनेक्‍टिव्हीटीमुळे त्यांचा वापर सामान्यांच्या आवाक्‍यात येणार आहे. ‘आयओटी’मुळे माहितीचा विस्फोट प्रचंड होईल. आरोग्य, वाहतूक, शेती इत्यादी क्षेत्रांवर त्याचा मोठा परिणाम होईल. 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स
माणसाच्या बुद्धिमत्तेशी स्पर्धा करणारी मशिन्स पूर्ण क्षमतेने विकसित होण्यातील महत्त्वाचा टप्पा २०१७ मध्ये सोफिया नावाच्या रोबोटने गाठला. पृथ्वीवर ‘नागरिकत्व’ बहाल केलेला हा पहिला मानवनिर्मित रोबोट. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) ज्या वेगाने प्रगती करत आहे, ते पाहता या वर्षी मानवसदृश रोबोंच्या वापरामध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे.

माणूस करत असलेली अनेक कामे रोबोटद्वारे करण्याची सुरवात गेल्या दशकभरात झालीच; आता जास्तीत जास्त कामे रोबोटकडे सुपूर्त करण्यास सुरवात होईल. अधिक वेगाने आणि अधिक ‘स्मार्ट’पणाने मशिनद्वारे कामे करण्यास २०१८ मध्ये सुरवात होईल, असे संशोधकांचे सांगणे आहे. 

व्हर्च्युअल रिॲलिटी
व्हर्चुअल रिॲलिटी (व्हीआर) किंवा आभासी वास्तव मांडण्याचे तंत्रज्ञान गत चार वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित झाले आहे. चित्रपट आणि गेमिंगसारख्या माध्यमांमध्ये त्याचा वापर सुरू आहे. ‘व्हीआर’ची आतापर्यंतची आवृत्ती १.० होती, असे मानले जाते आणि २.० आवृत्ती २०१८ मध्ये सुरू होत आहे. ‘फेसबुक’चे ओक्‍युलस गो हे ‘व्हीआर’ उपकरण या वर्षीच्या सुरवातीसच बाजारात येत आहे. त्याने गेमिंग आणि आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा अपूर्व अनुभव लोकांना जागेवर बसून घेता येईल.

‘फेसबुक’च नव्हे, तर ‘गुगल’नेही ‘व्हीआर’ उपकरणांच्या बाजारपेठेसाठी स्वतःला सज्ज केले आहे. आतापर्यंत आपण पडद्यावर सिनेमे पाहिले; आता सिनेमे पडद्यावर अनुभवता येतील. 

आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये या वर्षात प्रचंड बदल होतील. यामध्ये रुग्णांच्या आणि आजारांच्या माहितीला महत्त्व असेल. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित घटक अर्थातच हे बदल त्रयस्थ भूमिकेतून पाहू शकणार नाहीत. वैद्यकीय क्षेत्राला आमूलाग्र बदलांना सामोरे जावे लागेल. यात रुग्णसेवेच्या दर्जापासून एखाद्या आजाराविषयीची किंवा तत्सम माहिती ‘शेअर’ करण्यावर भर द्यावा लागेल. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाशी संबंधित गुंतवणुकीवरही अधिक भर द्यावा लागेल.
- गुरप्रीतसिंग, ‘पीडब्ल्यूसी’चे अमेरिकी आरोग्य सेवा क्षेत्राचे संचालक

भविष्यातील न्यायव्यवस्था ‘डेटा’वर जास्त अवलंबून असेल. याचा अर्थ, न्यायव्यवस्थेशी संबंधित कोणतीही संस्था तंत्रज्ञान कौशल्याने वापरू लागेल आणि त्याद्वारे अधिक अचूक व काही ठोस गृहीतकांवर आधारित निर्णय त्यांच्याकडून घेतले जातील. हल्ली कोणतीही गोष्ट/वस्तू ‘सेन्सर’ असू शकते. स्मार्ट रेडिओ, स्मार्टफोन आणि शरीरावर लावलेले कॅमेरे यामुळे पोलिस अधिकारीही ‘सेन्सर’ म्हणूनच काम करत आहेत. भविष्यातील तंत्रज्ञानानुसार हे ‘सेन्सर’ मिळालेली सर्व माहिती वेगाने ‘प्रोसेस’ करतील.
- जॉन बेक, ‘इसरी’मधील जागतिक न्यायव्यवस्था विभागाचे व्यवस्थापक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com