गावरान आंब्याचा हंगाम जोरात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

पुणे - कोकण हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, गावरान आंब्याचा हंगाम जोर धरू लागला आहे. गुजरात केशर या आंब्याचीही आवक आता वाढू लागली आहे.

पुणे - कोकण हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, गावरान आंब्याचा हंगाम जोर धरू लागला आहे. गुजरात केशर या आंब्याचीही आवक आता वाढू लागली आहे.

पुण्यातील बाजारात कर्नाटक हापूस आणि कोकणातील (रत्नागिरी) हापूस आंब्याचा हंगाम संपत आला आहे. पुढील पंधरा दिवसांत आंब्याची आवक कमी होत जाईल. एप्रिल महिन्याच्या शेवटी हापूस आंब्याची दुसरी तोड सुरू झाली होती. ती आता संपत आली.

कोकणातील हापूस आंब्याचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी पुण्यातील बाजारात तो विक्रीला पाठविण्याऐवजी "कॅनिंग'साठी पाठविण्यास पसंती देत आहेत. बाजारात कच्च्या आंब्याची आवक कमी होत असून, फळ आकाराने लहान येऊ लागले आहेत. फळ लहान असले, तरी चवीत बदल होत नाही, असा दावा व्यापारी करत आहेत. सध्या रत्नागिरी हापूसच्या प्रतिडझनाला 200 ते 250 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. रविवारी (ता. 28) हापूस आंब्याच्या हजार ते बाराशे पेट्या इतकी आवक झाली. येत्या आठवड्यात कच्च्या आंब्याची आवक आणखी कमी होईल आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यात तयार आंबा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार नाही, त्या वेळी कदाचित आब्यांचा भाव थोडा वाढू शकतो अर्थातच पाऊस हादेखील महत्त्वाचा भाग असेल, असे अडतदार अरविंद मोरे यांनी सांगितले.

रत्नागिरीप्रमाणेच कर्नाटक हापूस आंब्याची आवकही कमी होऊ लागली आहे. त्याचाही हंगाम पुढील पंधरा दिवसच चालेल, अशी स्थिती आहे. या दोन्ही आंब्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर गावरान हापूस आंब्याची आवक सुरू होते.

केशर आंब्याची आवक वाढणार
जिल्ह्यातील मावळ, मुळशी भागातून हापूस, पायरी, रायवळ या आंब्यांची आवक होत आहे. गावरान हापूस 200 ते 250 रुपये डझन, पायरी 100 ते 120 रुपये डझन, रायवळ 40 रुपये डझन असा भाव या आंब्यांचा असून, जुलैअखेरपर्यंत या आंब्यांचा हंगाम सुरू राहील, असे व्यापारी तात्या कोंडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गुजरात येथील केशर आंब्याची आवक आता वाढू लागेल. या आंब्यालादेखील चांगली मागणी असते. बदाम, दहशरी, नाटी आदी प्रकारच्या आंब्यांचा हंगामही जोरात सुरू आहे.

Web Title: pune news gavran mango season increase