गझलांच्या मैफलीला "इर्शाद'चा रंग!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

पुणे - 'हा तुझा दगडी किनारा भेटला मला', "मी गझल केली बरे केले मना, विठ्ठलाशी बोलता आले मला', "सावली आली फळाला तर समजेल तुला' अशा एकाहून एक सरस गझल आणि शायरीने पुणेकरांची शुक्रवारची सायंकाळ सुखद केली. नामवंत गझलकारांच्या गझलांना मिळणारा "इर्शाद' आणि त्यापाठोपाठ ओठांमधून आपसूक उमटणाऱ्या "वा क्‍या बात है' या शब्दांनी गझलकारांसह अवघे सभागृह भारावून गेले. निमित्त होते, पंढरपूरच्या वैभव कुलकर्णी या युवा गझलकाराच्या सन्मानाचे!

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि श्‍यामची आई फाउंडेशनतर्फे "भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार' कुलकर्णी यांना नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी गझल अभ्यासक भूषण कटककर, फाउंडेशनचे अध्यक्ष भारत देसडला, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आडकर उपस्थित होते.

कुलकर्णी यांनी सादर केलेल्या "भेटतो पाऊस तेव्हा काय होते जंगलाचे', "एकही नसते शिखर काबिज करण्यासारखे', "स्मृतींना पाहिजे आहे, अंधार एखादा' अशा अप्रतिम रचनांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यापाठोपाठ कटककर आणि देशमुख यांनीही गझल व शायरी सादर करत मैफलीत रंग भरले.

कुलकर्णी म्हणाले, 'अपयशाने खचून चाललो असताना मला गझलेने साथ दिली. मला गझलेमध्ये कायम विठ्ठल दिसत राहिला. पुढे गझलेतही स्पर्धा, कंपू, गटतट व राजकारण दिसले. त्यातूनही बाहेर पडत मी अंतर्मुख झालो. चांगली गझल निर्माण करणे हे गझलकारांचे कर्तव्य आहे.''

कुलकर्णी यांचे कौतुक करत कटककर म्हणाले, ""दिग्गज गझलकारांच्या काळातील गझलकार आपली कला सादर करत असतानाही वैभवसारख्या युवा कलाकाराला पाटणकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे, ही आनंदाची बाब आहे. पाटणकर यांनी गझल व शायरीसारखा कला प्रकार सामान्यांपर्यंत पोचविला. वैभवची गझल आयुष्यापेक्षा सुंदर आहे. वैभव गझलेचा अभ्यासक म्हणून मोठे कार्य करत आहे.''

कुलकर्णी यांच्या गझलेचे कौतुक करत देशमुख यांनी पाटणकर व समकालीन गझलकारांच्या गझलांचा आढावा घेतला.

इंटरनेटवरील साहित्याची दखल घ्यावी
'इंटरनेटवरील फेसबुक, ट्‌विटर, ब्लॉग यांसारख्या समाजमाध्यमांवरील लेखक, कवी, गझलकारांच्या रचना खूप चांगल्या आहेत. दुर्दैवाने या नव्या साहित्याची आत्तापर्यंत साहित्य संमेलनात दखल घेतली नाही. मात्र आगामी मराठी साहित्य संमेलनात इंटरनेटवरील साहित्याची दखल घ्यावी,'' अशी मागणी कटककर यांनी केली.

Web Title: pune news gazal maifil