ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष

ऐतिहासिक ठेव्याकडे दुर्लक्ष

पुणे - आकर्षक कोरीव दगडी चिरा, नदीपात्रात उतरणाऱ्या सुंदर पायऱ्या, लक्षवेधी दगडी बुरूज असा ऐतिहासिक ठेवा असलेला ‘घोरपडे घाट’ सध्या महापालिका आणि पाटबंधारे खात्याच्या वादात अडकला आहे. त्यामुळे त्याचे सुशोभीकरण रखडले आहे. परिणामी, घाटावर असलेल्या महादेवाच्या पिंडीला आणि नंदीला उघड्यावरच कचऱ्यात खिचपत राहावे लागत आहे. 

शहराच्या मध्य भागात शिवाजी पुलाखाली असणारा हा ‘घोरपडे घाट’ महापालिकेच्या ‘वारसा यादीत’ नोंदलेला आहे. तरीही वारसा विभागाकडून येथे साधा नामफलकही उभारलेला नाही. दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि कचऱ्याच्या ढिगामध्ये मोडकळीस आलेल्या घाटाच्या दगडी चिऱ्यांचे बुरूज व पायऱ्यांची दुरवस्था झाली आहे. 

या संदर्भात महापालिकेत चौकशी केली असता, सन २०१४ मध्ये महापालिकेकडून हा घोरपडे घाटाच्या दुरुस्तीचे व सुशोभीकरणाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र हा घाट नदीपात्रात येत असल्याने पाटबंधारे खात्याकडून कामास परवानगी मिळत नसल्याचे सांगण्यात आले. हा घाट पुण्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात येतो. शहराच्या विकासकामांमध्ये हा ऐतिहासिक घाट नष्ट होण्याची शक्‍यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 

नदीपात्रातील विविध घाट व पुरातन मंदिरे; तसेच समाधी आहे. शहरविकासाच्या प्रवाहात हे नष्ट होऊ नये. या घाटाला लोकमान्य टिळक सांस्कृतिक गणेश घाट असे नाव देऊन पुनरुज्जीवित करावे. तेथील शिवलिंगला एक मंदिर व उद्यान तयार करावे.
- सचिन तळे, नागरिक

या घाटाची जागा खासगी मालकीमध्ये येत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही फलक लावू शकत नाही; तसेच हा घाट निळ्या रेषेमध्ये (ब्ल्यू लाइन) येतो. त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून सुशोभीकरणाच्या कामाला परवानगी नाकारलेली आहे. या कारणास्तव हे काम थांबलेले आहे.
- हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता, वारसा व्यवस्थापकीय विभाग, महापालिका

काय आहे घोरपडे घाटाचा इतिहास? 
१० फेब्रुवारी १८३१ रोजी यशवंतराव घोरपडे यांचे पुत्र दौलतराव घोरपडे यांनी ‘घोरपडे घाटा’ची निर्मिती केली.
पूर्वी या परिसरात दौलतराव घोरपडे यांच्या मातुःश्री बयाबाई घोरपडे यांची समाधी होती. यालाच ‘कळकीचा बाग’ संबोधले जात होते.
आठ एकर चाळीस गुंठ्यांमध्ये असणारा हा परिसर ब्रिटिश सरकारने दौलतराव घोरपडे यांना इनाम म्हणून देण्यात आला होता.
या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर होते. मात्र १९६१ मध्ये आलेल्या महापुरात ते वाहून गेले. मात्र, या ठिकाणी महादेवाची पिंड व नंदी त्याच जागेवर आहेत. सध्या घाटाची दुरवस्था झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com