संस्कारांचे शिक्षण देणाऱ्या संस्था टिकून - गिरीश बापट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

पुणे - 'आजच्या बाजारीकरणाच्या युगात शिक्षणाचे व्यापारीकरण न करता चांगल्या संस्कारांचे शिक्षण देणाऱ्या काही शिक्षणसंस्था आजही महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे नाव घ्यावे लागेल,'' असे गौरवोद्‌गार पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढले.

पुणे - 'आजच्या बाजारीकरणाच्या युगात शिक्षणाचे व्यापारीकरण न करता चांगल्या संस्कारांचे शिक्षण देणाऱ्या काही शिक्षणसंस्था आजही महाराष्ट्रात आहेत. त्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेचे नाव घ्यावे लागेल,'' असे गौरवोद्‌गार पालकमंत्री गिरीश बापट यांनी काढले.

शिक्षण प्रसारक मंडळींच्या 130व्या वर्धापन दिनानिमित्त आज एसपीएम पब्लिक स्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेच्या टेबल टेनिस हॉलचे उद्‌घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, विश्‍वस्त अशोक वझे, माधुरी मिसाळ, जयंत किराड, सतीश पवार, एसपीएम शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा मॉरिस आदी मान्यवर उपस्थित होते.

बापट म्हणाले, 'सध्या लोकसंख्या वाढत आहे. दर्जेदार शिक्षण मिळण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर पालक आणि नागरिकांकडून होत आहे. पण मुलांना मानसिक, शारीरिक, शैक्षणिक शिक्षण मिळाले, तरच परिपूर्ण शिक्षण मिळते आणि त्याचा विकासही होतो.''

डॉ. करमळकर म्हणाले, 'ढासळणारी नीतिमूल्ये व संस्कारांच्या व्यवस्थेत चांगले संस्कार देणाऱ्या आणि शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्तेला महत्त्व देणाऱ्या जुन्या संस्था आजही पुण्यात आहेत.''

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी आपल्याकडे चांगले शिक्षक आणि चांगल्या वातावरणाची गरज असल्याचे जैन यांनी सांगितले. ते म्हणाले, 'सीबीएसई शाळा सुरू करतानाही संस्थेने प्रथम दर्जा आणि चांगल्या पायाभूत सुविधा देण्याचा विचार केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच संस्थेचे उद्दिष्ट राहिले आहे. यापुढील काळातही संस्था त्याच दिशेने जात राहील.''

Web Title: pune news girish bapat talking