गिरीश कासारवल्ली यांना "झेनिथ एशिया' सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे - सहा वर्षांनंतर पुण्यात पुन्हा एकदा आशियाई चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. यात 15 देशांतील 50 हून अधिक चित्रपट पाहायची संधी उपलब्ध होणार आहे. ख्यातनाम कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना या महोत्सवात "झेनिथ एशिया'; तर अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना "जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

पुणे - सहा वर्षांनंतर पुण्यात पुन्हा एकदा आशियाई चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. यात 15 देशांतील 50 हून अधिक चित्रपट पाहायची संधी उपलब्ध होणार आहे. ख्यातनाम कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना या महोत्सवात "झेनिथ एशिया'; तर अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना "जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. 

आशय फिल्म क्‍लबच्या वतीने 24 ते 30 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, एशियन फिल्म फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा महोत्सव रंगणार आहे. याचे उद्‌घाटन दिग्दर्शक सुमित्रा भावे यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात बुधवारी (ता. 24) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सोहळ्यात "झेनिथ एशिया' पुरस्काराचे वितरण होईल. समारोप सोहळा अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या वेळी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. 

या महोत्सवात "इंडियन व्हिस्टा', "ऑफबीट', "स्पेक्‍ट्रम एशिया' अशा विभागात वेगवेगळ्या देशांतील चित्रपट; तर "ऑफबीट बॉलिवूड'मध्ये "सीआरडी', "न्यूटन', "फोबिया', "कडवी हवा', "माय मराठी' विभागात "माझं भिरभिरं', "क्षितिज', "रेडू', "असेही एकदा व्हावे', "ती सध्या काय करते', "पिंपळ' हे चित्रपट पाहता येणार आहेत. याशिवाय व्हिएतनाममधील चित्रपटांचा स्वतंत्र विभाग असणार आहे. त्यात सात व्हिएतनामी चित्रपट सादर होतील. इराणी चित्रपटांच्या विभागात चार इराणी चित्रपट असतील. ओम पुरी, टॉम अल्टर, कुंदन शहा, बालू महेंद्र यांना त्यांच्या चित्रपटाच्या सादरीकरणातून आदरांजलीही वाहण्यात येणार आहे, अशी माहिती "आशय'चे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार यांनी दिली. या वेळी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, "एफटीआयआय'चे संचालक भूपेंद्र कॅंथोला उपस्थित होते. महोत्सवातील चित्रपट हे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत दाखवले जातील. 

Web Title: pune news Girish Kasaravalli Dilip Prabhavalkar award