मुलीच्या येण्याने कुटुंब परिपूर्ण

सुवर्णा चव्हाण
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुलगा-मुलगी भेद करणे साफ चुकीचे आहे. दत्तक घेतल्याचे माहीत असूनही श्रेयाने आमचा आई-वडील म्हणून स्वीकार केला. ती खूप समजदार आहे आणि प्रेमळही. तिने आम्हाला बांधून ठेवले आहे. पालक-पाल्यांमध्ये संवाद हवा, कारण हाच संवाद नात्यांना अर्थ देतो.
- डॉ. श्रीकांत खाडिलकर, श्रेयाचे वडील

पुणे - ‘‘श्रेया आज २३ वर्षांची झाली आहे. ती जाणून आहे, की आम्ही तिला दत्तक घेतले आहे. तिच्याशी जोडलेला बंध हा रक्‍ताच्या नात्यापेक्षा दृढ आहे. तिच्या येण्याने आमचे कुटुंब पूर्ण झाले आणि जगण्याला अर्थ मिळाला. एक मुलगा असूनही आम्ही एक मुलगी दत्तक घेतली. समाजाने या निर्णयाला विरोध केला नाही. कारण हा माझा आणि माझ्या पत्नीचा निर्णय होता. सहा महिन्यांची असताना कुटुंबात दाखल झालेली श्रेया आज इन्फोसिसमध्ये नोकरी करत आहे. ती आमच्या कुटुंबाचा आधार आहे,’’ असे डॉ. श्रीकांत खाडिलकर सांगत होते.

बोपोडी येथील नदीपात्रात एका आईने आपल्या चिमुकल्या मुलीला फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. त्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने मुलगी दत्तक घेणाऱ्या पालकांशी संवाद साधून त्यांचे मुलीशी असलेले ऋणानुबंध जाणून घेतले. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेत ज्ञान व्यवस्थापक या पदावर काम करणाऱ्या डॉ. खाडिलकर यांनी एक मुलगा झाल्यानंतर कुटुंबाला पूर्णत्व यावे, यासाठी मुलगी दत्तक घेतली. 

निवृत्त प्राप्तिकर अधिकारी असलेल्या त्यांच्या पत्नी अनुरंजनी यांनीही त्यांना साथ दिली. दोघांच्या संमतीने श्रेयाला घरी आणले. आई- वडिलांसह तिचा भाऊ श्रीरंग याच्याशीही तिचे नाते दृढ आहे.

डॉ. खाडिलकर म्हणाले, ‘‘मुलगी दत्तक घेतली म्हणून कोणी विरोध केला नाही. उलट आमच्या निर्णयाचे स्वागतच झाले. मुलगी घरी आल्यानंतर कुटुंब पूर्ण झाले. श्रेयानेही आमच्या कुटुंबाला अर्थ दिला. मुलगी ही कुटुंबाला भावनिकदृष्ट्या जोडून ठेवते. श्रेया ही माझी मैत्रीण आणि एक आधारवड आहे. तिच्याशी असलेले नाते अव्यक्त असेच आहे.’’

Web Title: pune news girl