नकुशी बनली विश्‍वचषक विजेती

मीनाक्षी गुरव
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

पुणे - जन्मानंतर कमकुवत असल्यामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे जन्मदात्यांनी ‘ती’ला ससून रुग्णालयातील सोफोश अनाथाश्रमात आणून सोडले असता मायेच्या कुशीतल्या ऊबेसाठी आसुसलेल्या ‘तिला’ अमेरिकन दांपत्याने दत्तक घेतले. कालांतराने हे दांपत्य ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले आणि तीही तिथेच लहानाची मोठी झाली. अवघ्या पंधराव्या वर्षी तिने क्रिकेटच्या संघात प्रवेश मिळविला.

पुणे - जन्मानंतर कमकुवत असल्यामुळे म्हणा किंवा अन्य काही कारणांमुळे जन्मदात्यांनी ‘ती’ला ससून रुग्णालयातील सोफोश अनाथाश्रमात आणून सोडले असता मायेच्या कुशीतल्या ऊबेसाठी आसुसलेल्या ‘तिला’ अमेरिकन दांपत्याने दत्तक घेतले. कालांतराने हे दांपत्य ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले आणि तीही तिथेच लहानाची मोठी झाली. अवघ्या पंधराव्या वर्षी तिने क्रिकेटच्या संघात प्रवेश मिळविला. २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाला तिच्या नेतृत्वाखाली विश्‍वचषक जिंकून दिला आणि त्यानंतर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, अशी ही लिसा स्थळेकर मूळ अमेरिकन पण सध्या ऑस्ट्रेलियन झालेल्या दांपत्याचा व देशाचा अभिमान बनली.

घराला वंशाचा दिवा हवा म्हणून सुरवातीच्या काळात मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक होते. आता या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसत आहे. मुलगी हीच जास्त प्रेमळ, मायाळू असते. तिच्या असण्यामुळेच कुटुंब परिपूर्ण होते... अन्‌ दोन घरांमध्ये ऋणानुबंध निर्माण होतात, म्हणून ‘ती’ हवीहवीशी वाटत आहे. काहींना ‘ती’ एकुलती एक म्हणून, तर काहींना एकीला एक जोडीदार म्हणून ‘ती’ हवी आहे. म्हणूनच नव्वदीच्या दशकापासून ‘ती’ला दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते. आता मुलगी दत्तक घेतल्यास एकाच घरात नव्हे तर आसपासच्या मित्र परिवारातही अभिमान वाटतो, मान उंचावली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.

स्पार्क’च्या संचालिका माधवी अभ्यंकर म्हणाल्या, ‘‘समाजाच्या मानसिकतेत बदल होत असल्याचे काही वर्षांपासून दिसत आहे. अर्थात, अनाथालयात येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली नसली, तरीही मुलींना दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या मात्र वाढत आहे, हे निश्‍चित. पुण्यासह देशभरातून दत्तक घेतलेल्या मुलींनी विविध क्षेत्रांत आणि मोठमोठ्या पदांवर आपले नाव कोरले आहे. लिसा ही देखील त्यातील एक. अनेक मुली शास्त्रज्ञ, यशस्वी उद्योजिका बनल्या असून अनेकींनी यशाचे शिखर गाठले आहे. एक मुलगा असतानाही ‘ती’ला दत्तक घेतले जात आहे. ‘सिंगल पॅरेटिंग’मध्येही अनेकांना ‘ती’ हवी आहे. यात ‘सिंगल’ आईलाच नव्हे, तर ‘सिंगल’ वडिलांनाही तिची खंबीर साथ हवी आहे.’’

बाळ दत्तक घेण्यासाठी देशभरात सध्या किमान दीड वर्षाची प्रतीक्षा यादी आहे. यात ‘बाय चॉइस’नुसार मुली दत्तक घेणाऱ्या पालकांची संख्या तुलनेने वाढली आहे. एक मुलगा असला, तरीही पालकांना ‘ती’ हवीच आहे. म्हणून मुलगी दत्तक घेतली जात आहे. तर काही पालक एकुलती एक लेक म्हणून ‘ती’ला दत्तक घेत आहेत.
- माधवी अभ्यंकर, संचालिका, स्पार्क

Web Title: pune news girl