एकुलती एक लेक सांभाळते सासर-माहेर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे- एकुलती एक मुलगी लग्नानंतर सासू- सासऱ्यांसह आई-वडिलांचीही काळजी घेत, दोन घरे सांभाळण्याची किमया साधते आणि कर्तृत्त्वाचा साक्षात्कार घडविते, असा अनुभव काही वेळा येतो. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेमध्ये काही प्रमाणात नकुशी वाटणारी लेक आता हवीहवीशी वाटायला लागल्याची भावना वाढते आहे. 

सुमारे ४१ वर्षांपूर्वी जाणीवपूर्वक एकाच मुलीला जन्म देण्याचे ठरविणाऱ्या आई-वडिलांचाही विश्‍वास मुलीने सार्थ राखला आणि सासरच्या मंडळींना आपलेसे केले. प्रीती चिंचाळकर यांची ही कथा प्रातिनिधीक असून, समाजातील अनेक एकुलत्या एक मुलींची प्रेरक वाटचाल आहे. प्रभाकर आणि अलका कुलकर्णी या दांपत्याची प्रीती ही एकुलती एक मुलगी. नोकरदार असलेल्या कुलकर्णी दांपत्याने ४१ वर्षांपूर्वी मुलगी झाल्यावर तिच्याच संगोपनावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. शिक्षण पूर्ण झाल्यावर २००० मध्ये मुलीचे लग्न झाले. पुण्यातच सासर मिळालेल्या प्रीतीने लग्नापूर्वीच स्पष्ट केले होते की, लग्नानंतर मी आई- वडिलांकडे लक्ष देणार आहे. त्याला पती संजयसह सासरच्या मंडळींनी होकार दाखविला. त्यामुळे नोकरी करीत दोन्ही घरे सांभाळण्याची किमया प्रीती यांनी साधली. 

सासू- सासरे, पती आणि मुलगा यांच्याकडे लक्ष देतानाच प्रीती आई-वडिलांच्याही संपर्कात असते. आठवड्यातून किमान दोन वेळा माहेरी म्हणजे आई-वडिलांची भेट देऊन त्यांची काळजी घेते. आई-वडील राहत असलेल्या घरांची देखभाल दुरुस्ती असो अथवा बाहेरची काही कामे, एका मुलासारखीच किंवा त्याहून अधिक जबाबदारीने प्रीती त्यांचे संगोपन करते. याबाबत प्रीती म्हणाली, ‘‘एका मुलीनंतर थांबायचा निर्णय आई-वडिलांनी घेतला, तो सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून. त्यामुळे जबाबदारीचे बाळकडू घरातच मिळाले. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ करण्याची संधी मला मिळाली आणि ती चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करते, याचेच मला समाधान आहे.’’

घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेते, म्हणून सासरचीही मंडळी साथ देतात त्यामुळेच हे सगळे शक्‍य झाले, अशी प्रीतीची भावना आहे. या पद्धतीने मी एकटीच नाही, तर समाजातील अनेक एकुलत्या एक मुली अशा प्रकारे दोन्ही घरे सांभाळतात. त्यामुळे मुलगाच हवा, असा हट्ट करणाऱ्या पालकांनी मुलींवर विश्‍वास ठेवला पाहिजे. 
- प्रीती चिंचाळकर

Web Title: pune news girl