टॅंकर दुकानात घुसून अभियंता तरुणीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

पुणे/ खडकवासला - वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्‍स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसला. त्यामुळे झालेल्या या अपघातात आयटी पार्कमधील संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाला; तर अन्य दोघे जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

पुणे/ खडकवासला - वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळ भरधाव रेडिमिक्‍स सिमेंटचा टॅंकर मिठाईच्या दुकानात घुसला. त्यामुळे झालेल्या या अपघातात आयटी पार्कमधील संगणक अभियंता तरुणीचा मृत्यू झाला; तर अन्य दोघे जण जखमी झाले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

स्वाती मधुकर ओरके (वय 29, रा. लेडीज हॉस्टेल, औदुंबर कॉलनी, कर्वेनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी मूळची वर्धा जिल्ह्यातील फुलगाव येथील असून, येथील आयटी कंपनीत नोकरीस होती; तर संदीप संतोष पाटील (वय 30, रा. वाल्हेकर कॉलनी, नऱ्हे) आणि सुनील बाबासाहेब साळुंखे (वय 40, रा. भूमकरनगर, नऱ्हे) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात टॅंकर चालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलाच्या परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कात्रजकडून लुंकड ट्रान्सपोर्टचा रेडिमिक्‍स सिमेंट घेऊन जाणारा टॅंकर येत होता. भरधाव येणाऱ्या टॅंकरचालकाला वेग आटोक्‍यात आणता आला नाही. पुलाखाली आल्यावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टॅंकर विश्‍व आर्केड इमारतीमध्ये घुसला. तेथील सिरवी मिठाईवाले दुकानासमोरच फास्टफूड आणि उसाच्या रसाचा स्टॉल आहे. या स्टॉलवर आयटी कंपनीमधील कर्मचारी दुपारी उसाचा रस पिण्यासाठी आले होते. स्वाती आणि तिचे सहकारी शेजारीच सिरवी मिठाई दुकानाच्या पायऱ्यांवर बसले होते. त्या वेळी टॅंकर आवारात घुसत असल्याचे दिसताक्षणी ते उठून पळत होते; परंतु स्वातीचा पाय घसरल्यामुळे ती पायऱ्यांवर पडून टॅंकरच्या चाकाखाली अडकली. अपघातानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. स्वातीला टॅंकरखालून काढताना अग्निशमन दलाला बरेच प्रयत्न करावे लागले. तिचा मृतदेह टॅंकरखालून काढून ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.

टॅंकर सव्वाशे फूट आत
नवले पुलाजवळ तीव्र उतार असल्यामुळे अपघात होत आहेत. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यात येत नाहीत. तसेच, टॅंकर रस्ता सोडून थेट सव्वाशे फूट इमारतीमध्ये कसा गेला, असा प्रश्न हा प्रसंग पाहणाऱ्यांना पडत होता. या अपघातात दुकानासमोरील भिंत कोसळली.

Web Title: pune news girl death by tanker accident