लहान मुलांशी अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी सक्तमजुरी

संदीप जगदाळे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

या प्रकरणात पीडित मुला-मुलींची संख्या दहा इतकी होती. त्यातील दोन पीडितांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. आरोपीच्या दहशतीला घाबरून इतर साक्षीसाठी न आल्याचे अॅड. अगरवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

पुणे : लहान मुलांना खाऊ देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याशी अश्‍लील चाळे करणाऱ्या तरूणाला पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली आहे. 

संदीप सुरेश साळुंखे (वय 25, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित मुलीच्या वडिलांनी हडपसर पोलिसांत फिर्याद दिली होती. संदीप हा आपल्या घराच्या परिसरातील दहा वर्षांच्या आतील लहान मुला-मुलींना खाऊ देण्याचे आमिष दाखवून घरी बोलवायचा. नंतर त्यांच्याशी अश्‍लिल चाळे करत होता. या प्रकाराबाबत घरच्यांना न सांगण्याबाबत तो मुलांना धमकवत होता. फिर्यादी पालकाची नउ वर्षाची मुलगी मार्च 2015 रोजी शाळेत गेली होती. संदीप याने तिला वर्गातून बाहेर बोलावून घेतले. तिला बाहेर नेऊन तो तिच्याशी अश्‍लील चाळे करू लागला. ती मुलगी त्याच्या तावडीतून सुटून पुन्हा वर्गात केली. नंतर पून्हा साळुंखे पुन्हा शाळेत गेला. शाळेतील शिक्षकांनी तु कोण आहे, असे त्याला विचारले. मी पीडितेचा भाव असून, तिला घरी नेण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले. मात्र, मुलीने तो भाऊ नसल्याबाबत शिक्षकांना सांगितले. त्यामुळे शिक्षकांनी मुलीला त्याच्याबरोबर पाठविले नाही.

त्यानंतर झालेला प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. त्यानुसार वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली. हडपसर पोलिसांनी तपास करून न्यायालयात संदीप याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी चार साक्षीदार तपासले.

या प्रकरणात पीडित मुला-मुलींची संख्या दहा इतकी होती. त्यातील दोन पीडितांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. आरोपीच्या दहशतीला घाबरून इतर साक्षीसाठी न आल्याचे अॅड. अगरवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

गुन्हयाच्या सुनावणीनंतर संदीप याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रूपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी दिला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण पवार यांनी केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार ए. एस.गायकवाड यांनी मदत केली व आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली होती. 

Web Title: Pune news girl harassment court sentenced