समूह परिवर्तनासाठी आम्ही दूत बनू 

समूह परिवर्तनासाठी आम्ही दूत बनू 

पुणे - पहिली मुलगी झाल्यानंतर पुन्हा मुलगी नको म्हणणारा समाज, मुलगी झाली तर तिला मारून तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारे पालक, मूल जन्म घेण्याच्या आधीच बेकायदेशीर तपासणी करून "मुलगी आहे' हे सांगणारे डॉक्‍टर यांच्यात परिवर्तन आणण्यासाठी आम्ही दूत व्हायला तयार आहोत. सोसायट्यांपासून वाड्यावस्त्यापर्यंत जाऊन "नकुशी' ही कशी "हवीशी' होईल, याचा प्रचार करू. यासाठी शहर पिंजून काढायला आम्ही तयार आहोत, असा निर्धार वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांनी एकत्र येऊन बुधवारी केला. 

एका आईने आपली दहा दिवसांची मुलगी पाण्यात फेकून दिली. ही एक बातमी आपल्यासमोर आली आणि सर्वांना अस्वस्थ करून गेली. या पार्श्‍वभूमीवर "नकुशी नव्हे हवीशी' ही वृत्तमालिका "सकाळ' दररोज प्रसिद्ध करत आहे. याच्याच जोडीला समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतील महिलांना एकत्र आणून "सकाळ'ने बैठक आयोजित केली. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी आपली गणेशोत्सवाची तयारी बाजूला ठेवून या बैठकीला हजेरी लावली. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी उत्स्फूर्तपणे सूचना मांडल्या आणि लोकांमध्ये जनजागृती आणण्यासाठी घराबाहेर पडण्याची तयारीही दर्शवली. या बैठकीस शंभरहून अधिक जण उपस्थित होते. 

महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ""नकुशी' ही "हवेशी' कशी होईल, यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवरून प्रयत्न करायला हवेत. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा कडक असला तरी त्याद्वारे अनेक गैरप्रकार होत आहेत. हे टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहायला हवे. सरकारच्या माध्यमातून कायदे झाले; परंतु कायद्याचा पुरेपूर वापर होत नाही. बालक आणि महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच घराघरांतील मुलगा-मुलगी असा भेद नष्ट होण्यासाठी कुटुंबाचे समुपदेशन आवश्‍यक आहे.'' 

वस्ती पातळीवरच नव्हे, तर उच्चभ्रू वर्गातील लोकांनाही "मुलगी नको' वाटते. याचा अर्थ मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांत समुपदेशनाची गरज आहे. महापालिकेच्या शाळांमधील पौगंडावस्थेतील मुलींबरोबरच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची तपासणी करण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. या संदर्भातील सर्वेक्षण या वर्षभरात पूर्ण होईल आणि त्यात आढळून आलेल्या आरोग्यविषयक बाबींवर पुढील वर्षात काम केले जाईल, असेही त्या म्हणाल्या. 

आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ""निवडणुकीपूर्वी इच्छुक उमेदवार आपल्या स्वत:च्या प्रचारासाठी घरोघरी जातात. त्याप्रमाणे आता लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात घरोघरी जाऊन "लेक वाचवा' याविषयी प्रचार-प्रसार करायला हवा. लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रांतील महिलांनी ठिकठिकाणी जाऊन "मुलीच्या जन्माचे स्वागत करा', "ते का आवश्‍यक आहे' हे लोकांना पटवून द्यायला हवे. त्यासाठी आपण सर्वांनी दूत बनून काम करूया. मुलीचा जन्म झाला, तर डॉक्‍टरांनीदेखील कमी खर्चात उपचार करावेत. लेक वाचविण्यासाठी खऱ्याअर्थाने पुरुषांचे प्रबोधन करणे महत्त्वाचे ठरेल आणि पालकांनीही आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे.'' 

"सकाळ'चे संपादक मल्हार अरणकल्ले यांनी प्रास्ताविकात "सकाळ'ची भूमिका स्पष्ट केली. कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार यांनी समारोपामध्ये पुढील कार्याची दिशा सांगितली. सहयोगी संपादक सुनील माळी यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com