अल्पवयीन मुलीला विकले देहविक्रीसाठी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

पुणे - जन्मदात्या पित्याकडून लैंगिक अत्याचार, आत्याच्या नवऱ्याने देहविक्री व्यवसायासाठी एक लाख रुपयांमध्ये विक्री केली, असा नात्यांना काळिमा फासणारा दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे - जन्मदात्या पित्याकडून लैंगिक अत्याचार, आत्याच्या नवऱ्याने देहविक्री व्यवसायासाठी एक लाख रुपयांमध्ये विक्री केली, असा नात्यांना काळिमा फासणारा दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पीडित १६ वर्षीय मुलीच्या आईच्या आत्महत्येनंतर तीन वर्षे वडिलांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर मावशीने सांभाळले. परंतु गरिबी हटविण्याच्या बहाण्याने आत्याच्या नवऱ्याने एक लाखात विक्री करून तिला वेश्‍याव्यवसायाला जुंपले. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकून सुटका केल्यानंतर त्या मुलीने दिलेल्या जबाबामधून अत्याचाराची धक्कादायक बाब समोर आली. आत्याच्या नवऱ्याला येरवडा पोलिसांनी अटक केली असून, वडिलांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘पीडित मुलगी आई-वडिलांसह ताडीवाला रस्ता परिसरामध्ये राहण्यास होती. वडिलांच्या त्रासामुळे या मुलीच्या आईने सप्टेंबर २०१० मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर वडिलांना अटक झाली. तीन वर्षांनंतर जामिनावर मुक्तता झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. २०१३ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने मुलीवरच लैंगिक अत्याचार करायला सुरवात केली. तीन वर्षे अत्याचार सुरू होते. विरोध केल्यास ठार मारायची धमकी मिळायची. एकदा मुलगी गरोदर राहिली होती. त्या वेळी सावत्र आईने तिला धमकी देऊन गप्प केले. उलट गरोदर न राहण्याच्या गोळ्या देऊ लागली. वडिलांकडून होणारी मारहाण आणि छळाला कंटाळलेली ही मुलगी आत्याकडे मन मोकळे करायची.

आत्याला तिची दया आली. तिने तिला घरी नेले. वर्षभर ती त्यांच्याकडे येरवड्यातील एका सोसायटीमध्ये राहत होती. आत्याचे पती टेंपोचालक असून, त्यांना आठ वर्षांची एक मुलगी व चार वर्षांचा एक मुलगा आहे. टेंपो चालवून घर चालविणे अवघड जात असून, खर्च दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र या मुलीसमोर उभे करण्यात आले. आर्थिक अडचणी सांगत, तिला देहविक्रय केल्यास चांगले पैसे मिळतील आणि गरिबी दूर होईल, असे सांगू लागला. तिला देहविक्रयासाठी तयार केल्यानंतर त्याने ग्राहक शोधायला सुरवात केली. दरम्यान, त्याने आणखी एका सज्ञान मुलीचाही सौदा ठरवला होता. अवघ्या १६ वर्षांच्या मुलीचा त्याने एक लाख रुपयांमध्ये सौदा ठरवला होता. 

दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांना पोलिस नाईक प्रदीप शेलार यांच्याकडून या सर्व प्रकाराबाबत माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक शीतल भालेकर यांच्या पथकाने बनावट ग्राहकामार्फत आरोपीशी संपर्क साधला. ठरलेल्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व दोघींची सुटका केली. या मुलींची रवानगी सुधारगृहामध्ये केली असून, आत्याच्या नवऱ्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: pune news girl sold for prostitution business