‘कलेच्या शिक्षणासाठी व्यासपीठ देऊ’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

पुणे - ‘‘कलेचे शिक्षण घेतल्याने गुण मिळत नाहीत आणि नोकरीही, अशी नाराजी पालक व्यक्त करतात; पण वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सतत तीन वर्षं कुठलीही कला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही दहा गुण देण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीचे सोडा; पण सरकारने प्रायोजित केलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावर कला सादर करण्याची संधीही देण्याचा विचार करत आहोत,’’ अशी माहिती सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी जाहीर केली.

अखिल भारतीय सांस्कृतिक संघ ‘ग्लोबल हार्मनी’ नृत्य महोत्सवात ख्यातनाम नृत्यांगना सोनल मानसिंग यांना पहिला ‘स्वामी विवेकानंद राष्ट्रीय कला कीर्ती पुरस्कार’ तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर महोत्सवात सहभागी झालेल्या विविध राज्यांतील कलाकारांचा गौरवही झाला. आमदार माधुरी मिसाळ, ‘आकाशवाणी’चे संचालक आशिष भटनागर, व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर, आयोजक रत्ना वाघ, हेमंत वाघ उपस्थित होते.

तावडे म्हणाले, ‘‘शिक्षणपद्धतीची दिशा पूर्णपणे बुद्‌ध्यांक वाढविण्याकडे आहे. यामुळे विद्यार्थी ‘नासा’मध्ये जातील किंवा परदेशातील मोठमोठी पदे, नोकरी मिळवतील; पण या मुलांचा भावनांक वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण संस्कृतीशी घट्ट जोडले जातो. त्यासाठी कला महत्त्वाची आहे. म्हणून कलेचे शिक्षण महत्त्वाचे आहे; पण कला शिकल्याने काय मिळते, अशी नाराजीही व्यक्त होते. ती पुढे राहणार नाही, अशी पावले आम्ही उचलत आहोत.’’  

मानसिंग म्हणाल्या, ‘‘दगड आणि स्पंज असे शिष्यांचे दोन प्रकार आहेत, असे मला गुरू सांगायचे. दगडासमोर कितीही सांगा काहीही फरक पडत नाही; पण स्पंजसारखा शिष्य गुरूचा प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक भाव शोषून घेतो. त्याला मनन-चिंतनाची जोड देऊन त्याच गोष्टी नव्याने आपल्यासमोर आणतो, हा खरा शिष्य. परंपरा याचा अर्थ पुढे जा असा आहे. रूढी पाळा असे नाही. कलेची परंपरा आजही कायम आहे. ती काळानुसार बदलत आहे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ‘आकाशवाणी’वरून ‘मन की बात’ दूरदूरवर पोचवत आहेत; पण कलाकारांना आपली ‘मन की बात’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी हृदयातून व्यक्त व्हावे लागते. असे झाले तर दगडालाही पाझर फुटू शकतो.
- सोनल मानसिंग, नृत्यांगना

Web Title: pune news Give a platform for art education