रक्तघटकांसाठी रक्तपेढ्यांची दमछाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

पुणे - रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्‍यक रक्तघटक संकलित करताना रक्तपेढ्यांची दमछाक होत असल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे. यावर पर्याय म्हणून शहरातील रुग्णालयाशी संलग्न काही रक्तपेढ्या रक्त घटक देण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तदानाचा आग्रह करत असल्याचेही चित्र ठळकपणे दिसत आहे.

पुणे - रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्‍यक रक्तघटक संकलित करताना रक्तपेढ्यांची दमछाक होत असल्याचा निष्कर्ष पुढे येत आहे. यावर पर्याय म्हणून शहरातील रुग्णालयाशी संलग्न काही रक्तपेढ्या रक्त घटक देण्यापूर्वी रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तदानाचा आग्रह करत असल्याचेही चित्र ठळकपणे दिसत आहे.

जागतिक रक्तदाता दिन बुधवारी (ता. 14) साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने रुग्णाच्या नातेवाइकांकडून होणारी रक्तघटकांची मागणी आणि रक्तपेढ्यांतर्फे त्याचा होणारा पुरवठा याचा आढावा "सकाळ'तर्फे घेण्यात आला. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

रुग्णालयात उपचारांसाठी दाखल रुग्णाला प्लाझ्मा, प्लेटलेट्‌स, लालपेशी असे वेगवेगळे रक्तघटक आवश्‍यकतेप्रमाणे देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. हे रक्तघटक घेण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये गेलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांना सुरवातीला रक्तदान करावे लागते. त्यानंतर त्याला आवश्‍यक ते रक्तघटक मिळतात, अशी धक्कादायक माहिती शहरातील काही प्रमुख रुग्णालयाशी संलग्न रक्तपेढ्यांमधून पुढे आली आहे.

या बाबत रक्तपेढीच्या अधिकारी म्हणतात, 'रक्तघटकांची मोठी मागणी असते. मात्र, त्या तुलनेत रक्तसंकलन होत नाही, त्यामुळे रक्तघटक वेगळे काढता येत नाहीत. त्याचा रक्तघटकाची मागणी करणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तदानाची विनंती केली जाते. त्यांच्यावर सक्ती केली जात नाही.''

जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी म्हणाले, 'रुग्णाला रक्त किंवा रक्तघटक पुरविण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयावर आहे. ती रुग्णाची जबाबदारी नाही. त्याला त्यासाठी बदली रक्त देण्याची आवश्‍यकता नाही, हे रक्तदानाचे राष्ट्रीय धोरण आहे.''

रक्तघटक संकलनातील समस्या
दान केलेल्या रक्तातून वेगवेगळे रक्तघटक विलग करता येतात. मात्र, रक्त संकलन पुरेशा प्रमाणात होत नाही, हे या मागचे प्रमुख कारण आहे. रक्तदानाचे प्रमाण कमी असल्याने उपलब्ध रक्ताचा आणि रक्तघटकांचा काटकसरीने वापर केला पाहिजे, असेही डॉ. वाणी यांनी स्पष्ट केले.

उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा
उन्हाळ्याची आणि दिवाळीची सुटी या दरम्यान रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. जूनपासून शाळा-महाविद्यालये सुरू होताच रक्तदानाचे प्रमाण वाढते. मात्र, या सुट्यांमध्येच मोठ्या प्रमाणात नियोजित शस्त्रक्रिया होतात. त्यामुळे रक्तघटकांची मागणी वाढलेली असते, असे निरीक्षण या क्षेत्रातील जाणकारांनी नोंदविले. या बाबत पुण्यातील "केईएम' रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपर्यंत रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्ताचा तुटवडा होता. पण, आता रक्तसंकलन पूर्ववत होत आहे. या दरम्यान, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी मदतीचा हात दिला.''

रक्तहितवर्धिनी संस्थेचे चंद्रशेखर शिंदे म्हणाले, 'गरजेच्या प्रमाणात रक्तदान होत नाही. त्यातून रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. त्यासाठी रक्तदानाचे नियोजन, व्यवस्थापन करणाऱ्या रक्तपेढ्यांमध्ये कालसापेक्ष सुधारणा झाल्या पाहिजे.''

'रक्तदान हे खूप अवघड काम नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे रक्ताबरोबरच ते वेळेचेही दान आहे. कोणत्या तरी निमित्ताने देण्याऐवजी नियमित दिले पाहिजे,''
- सागर यादवाडकर, शतकोत्तर रक्तदाते

Web Title: pune news global blood donator day