महापालिका शाळांत मिळणार दर्जेदार सुविधा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

प्रशासनाचे नियोजन; प्रभागनिहाय शाळांची पाहणी करण्यासाठी समित्या

पुणे - महापालिका शाळांच्या इमारती, तेथील विद्यार्थी संख्या, शालेय साहित्य, क्रीडांगणे, क्रीडा साहित्य, संगणकप्रणाली आदी सुविधांची पाहणी करून दर्जेदार सुविधा उभारण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाचे नियोजन; प्रभागनिहाय शाळांची पाहणी करण्यासाठी समित्या

पुणे - महापालिका शाळांच्या इमारती, तेथील विद्यार्थी संख्या, शालेय साहित्य, क्रीडांगणे, क्रीडा साहित्य, संगणकप्रणाली आदी सुविधांची पाहणी करून दर्जेदार सुविधा उभारण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

प्रभागनिहाय शाळांची पाहणी करण्यासाठी समित्या नेमण्यात आल्या असून, पुढील महिनाभरात अहवाल मागविण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शाळांमध्ये आवश्‍यक त्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.
शिक्षण मंडळाचे अस्तित्व संपुष्टात आल्याने आता शिक्षण विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या ३१० शाळांचा कामकाज नव्या विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याकरिता नवे पदाधिकारी निवडीच्या हालचाली देखील सुरू आहेत. ही समिती अस्तित्वात येण्याआधी शाळांमध्ये सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा पुरविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून, शाळांमधील शालेय साहित्य, वर्गखोल्या, त्यांच्या दर्जासह क्रीडांगणाची पाहणी करण्यात येणार आहे. त्याकरिता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समित्या नेमण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या खात्यांमधील अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला.

समित्यांचा एकत्रित अहवाल आल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यात येईल. या पाहणीदरम्यान, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यात येतील. त्यानुसार नेमक्‍या सुविधा पुरविण्याचा प्रयत्न असेल,’’ असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

सर्वच शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’
महापालिका शिक्षण मंडळाने राबविलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर काही जुन्या योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपयुक्त योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून त्या सुरू केल्या  जातील. सर्वच शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

नव्या शिक्षण विभागांतर्गत विद्यार्थ्यांना चांगल्या सेवा-सुविधा पुरविण्याचा उद्देश आहे. उपलब्ध सुविधांची माहिती घेण्याचे काम सुरू असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल आल्यानंतर आवश्‍यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील. त्यासाठी कालमर्यादा ठरविण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या अपेक्षांचाही समावेश असेल.
- प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: pune news Good quality facilities available in municipal schools