सरकारला सर्वसामान्यांचा विसर - सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी, जात आणि धर्मात तेढ निर्माण करून या सरकारने गोंधळाचे वातावरण निर्माण केले. आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येविषयी कोणीच बोलत नाही. पुढील काळात कष्टकरीवर्गाला एकत्र करणे गरजेचे आहे.
- डॉ. बाबा आढाव

पुणे - ‘‘केंद्र आणि राज्य सरकारने सत्तेवर येणाऱ्यापूर्वी अनेक घोषणा केल्या; पण त्याची अंमलबजावणी करण्यात ते अपयशी ठरले आहे. सर्वसामान्यांचा त्यांना विसर पडला असून, नागरिकांच्या हिताचे निर्णय हे सरकार घेत नाही,’’ अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 

अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीने बहुजन अस्मिता परिषद आणि बहुजन अस्मिता मोर्चा आयोजिला होता. एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरवात झाली. लाल महाल येथे मोर्चाची सांगता झाल्यानंतर येथेच परिषद पार पडली. या वेळी सरकारचा निषेध करण्यासाठी अर्धातास मौन बाळगण्यात आले.

यानंतर सुळे बोलत होत्या. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. बाबा आढाव, भाई वैद्य, पी. ए. इनामदार, चित्रा वाघ, विद्या चव्हाण, उल्हास पवार, विकास पासलकर आदी उपस्थित होते. 

‘‘घोषणांची अंमलबजावणी करण्यापेक्षा हे सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. ग्रामीण भागातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. या शाळांमध्ये जाणारा विद्यार्थी हा सर्वसामान्य घरातील आहे. त्याचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही’’, असे मत सुळे यांनी व्यक्त केले. 

महापुरुषांचे नाव घेऊन राजकारण केले जाते, त्यांचे स्मारक उभे करण्याची घोषणा केली जाते; पण पुढे त्यावर काहीच केले जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली. सरकारविरोधात असंतोष निर्माण होत असल्याने पुढील काळात भावनिक प्रश्‍न सत्ताधाऱ्यांकडून निर्माण केला जाऊन त्यांचे अपयश झाकण्याचा प्रयत्न केला जाण्याचा धोका ओळखला पाहिजे, असे इनामदार यांनी नमूद केले. कोरेगाव भीमा येथील घटनेचा संदर्भ देत डॉ. आढाव यांनी सत्ताधारी हे राष्ट्रीय एकात्मतेला नख लावीत असल्याचा आरोप केला. पोकळ घोषणा करणारे हे सरकार असल्याचा आरोप वैद्य यांनी केला. सूत्रसंचालन विराज तावरे यांनी केले, तर प्रशांत धुमाळ यांनी आभार मानले.

Web Title: pune news government supriya sule