सत्ता राखण्यास नेत्यांना यश

बारामती - तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीसह उर्वरित ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय संपादन केल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष.
बारामती - तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीसह उर्वरित ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय संपादन केल्याचे जाहीर होताच कार्यकर्त्यांनी केलेला जल्लोष.

पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्य आणि जिल्हा पातळीवरील नेत्यांना आपापल्या गावाची सत्ता राखण्यात यश आले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून गावाची सूत्रे सातत्याने स्वतःच्या हातात कायम ठेवणाऱ्या प्रस्थापित गावपुढाऱ्यांना मतदारांनी सपशेल नाकारले आहे. अनेक गावांमध्ये प्रस्थापितांना झिडकारून सत्तेची सूत्रे तरुणांच्या हातात दिली आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (काटेवाडी, ता. बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष, आमदार दिलीप वळसे पाटील आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील (निरगुडसर, ता. आंबेगाव), भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे (पारवडी, ता. बारामती), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील गटनेते आणि माजी उपाध्यक्ष शरद लेंडे व आमदार शरद सोनवणे (पिंपळवंडी, ता. जुन्नर) आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशा बुचके (बुचकेवाडी, ता. जुन्नर) आदी नेत्यांना आपापल्या गावाची सत्ता कायम राखण्यात किंवा नव्याने मिळविण्यात यश आले आहे. पिंपळवंडी ग्रामपंचायतीत लेंडे आणि आमदार सोनवणे यांनी एकत्र येत, सर्वपक्षीय पॅनेल स्थापन केला होता. या पॅनेलला यश आले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची पिंपळवंडीत संयुक्त सत्ता असणार आहे. 

येत्या फेब्रुवारीअखेर मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. बुधवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. निवडणूक झालेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. काँग्रेस दुसऱ्या तर, केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेला भारतीय जनता पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

दरम्यान, अनेक ठिकाणी सरपंच एका गटाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचे बहुमत दुसऱ्या गटाकडे, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांना निर्णय घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

काटेवाडीत राष्ट्रवादीचाच झेंडा!
बारामती - संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या काटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भवानीमाता पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत १५ पैकी १४ जागा पटकावल्या. सरपंचपदी राष्ट्रवादीचे विद्याधर श्रीकांत काटे हे १५९२ ताधिक्‍याने निवडून आले. 

भाजप- रासप पुरस्कृत लोकशाही परिवर्तनवादी पॅनेलला मात्र एकही जागा 
मिळाली नाही. 

काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार उभे होते. लढत मात्र राष्ट्रवादीच्या विद्याधर काटे व भाजप- रासप युतीच्या पांडुरंग कचरे यांच्यात झाली. यामध्ये कचरे यांना १४६३ मते मिळाली, तर काटे यांना ३ हजार ५५ मते मिळाली. या निवडणुकीत विरोधकांच्या पॅनेलला एकही जागा मिळवता आली नाही.  

या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत भवानीमाता पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- राजू लक्ष्मण भिसे, हेमलता अमोल जगताप, प्रियांका प्रदीप देवकाते, समीर अजमुद्दीन मुलाणी, राहुल विलास काटे, शीतल अमोल काटे, नितीन लव्हा भिसे, धीरज लक्ष्मण घुले, रंजना लक्ष्मण लोखंडे, संजीवनी दत्तात्रेय गायकवाड, स्वाती संतोष लकडे, श्रीधर आनंद घुले, स्वाती अजित गडदरे व पद्मिनी पोपट देवकर.

‘विकासकामांचा विजय’
या विजयानंतर राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी त्या म्हणाल्या, ‘‘काटेवाडीत ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विकासावर मतदारांनीही शिक्कामोर्तब केले. विरोधकांना कोणतेही मुद्दे नसल्याने त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन केलेला प्रचारही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयमाने हाताळला. विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यात कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. विकासाला काटेवाडीकरांनी मत दिले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com