"जीएसटी'बाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी 48 केंद्रे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

पुणे - वस्तू व सेवा (जीएसटी) कराबाबतच्या शंकांचे निरसन व्हावे, यासाठी केंद्रीय वस्तू व सेवाकर आयुक्तालयातर्फे महाराष्ट्रासह गोव्यात 48 केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, तसेच 24 तास टोल फ्री क्रमांक सुरू केला जाईल, अशी माहिती "जीएसटी'च्या पुणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर यांनी दिली. 

जीएसटी संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी "जीएसटी'च्या पुणे विभाग उपायुक्त राजलक्ष्मी कदम उपस्थित होत्या. एक जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. या करप्रणालीबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. करदात्यांच्या मनात याबाबत कोणतीही शंका राहता कामा नये, यासाठी आयुक्तालयातर्फे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूरसह गोव्यात जीएसटी सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 18001200232 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही मानकोसकर यांनी केले. 

कदम म्हणाल्या, ""जीएसटीसाठी रिटर्न फाइल करणे अत्यंत सोपे आहे. त्यासाठी अनेक अर्ज भरावे लागतील, ही अफवा आहे. व्यावसायिकांना एकदाच रिटर्न भरावा लागेल. जीएसटी भरण्यासाठी काही मोफत टूल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत.'' 

केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयातर्फे येत्या शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ससून रस्ता येथील ऍशल्ये हाउस येथे "जीएसटी दिवस समारोह' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

नवीन नोंदणीसाठी 134 अर्ज 
केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर आणि व्हॅट मध्ये नोंदणीकृत असणाऱ्या करदात्यांपैकी सुमारे 90 टक्के करदाते जीएसटीमध्ये स्थालांतरित झाले असून, नवीन नोंदणीसाठी पुण्यात 134 अर्ज दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात एक हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. 

Web Title: pune news gst